मुंबई : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. गैरवर्तन करणाऱ्या पदाधिकाऱ्यांविरुद्धची निलंबनाची कारवाई रद्द करून त्यांना पुन्हा पद बहाल करण्याच्या निषेधात काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी राजीनामा दिला आहे.
आज शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी याबाबतची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे आज दुपारी 1.30 वाजता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार असल्याने या बैठकीतच घोषणा होण्याची शक्यता आहे. प्रियंका चतुर्वेदी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे.
प्रियंका चतुर्वेदी या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वी प्रियंका चतुर्वेदी यांनी महिलांसोबत गैरवर्तन करणाऱ्या गुंडांना पक्षात प्राधान्य दिलं जात असल्याचं म्हणत नाराजी व्यक्त केली होती. याबद्दल त्यांनी एक ट्विट केलं आहे. यात त्यांनी काँग्रेसच्या ट्विटर हँडललादेखील टॅग केलं होतं. त्या म्हणाल्या होत्या – काही माणसं मेहनत करुन पक्षात आपलं स्थान निर्माण करतात. मात्र त्यांच्याऐवजी महिलांसोबत गैरवर्तन करणाऱ्या मंडळींना पक्षात प्राधान्य दिलं जाते. ‘मी पक्षासाठी टीकेचा सामना केला. दगड झेलले. मात्र पक्षाच्या नेत्यांनीच मला धमक्या दिल्या. जे लोक धमक्या देत होते, ते वाचले. त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. ही बाब अतिशय दुर्दैवी आहे,’ अशा शब्दांमध्ये चतुर्वेदी यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली होती. या संदर्भातलं एक पत्रदेखील त्यांनी रिट्विट केलं होतं.