Saturday, January 28, 2023

काँग्रेस पक्षातर्फे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना निवेदन

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

हातनुर प्रकल्पाअंतर्गत मुक्ताईनगर तालुक्यातील  मेंढोदे येथील दुसऱ्या टप्प्यातील पुनर्वसनाच्या भूखंड कब्जा रकमेचा सरासरी दर कमी करण्यात यावा अशी मागणी काँग्रेस पक्षातर्फे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना मुक्ताईनगर येथील विश्रामगृहावर दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली. दरम्यान मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तात्काळ जिल्हाधिकारी जळगाव यांना सदर पत्राच्या प्रतीवर तत्काळ पूर्वीच्या प्रकल्पग्रस्तांसाठी लावण्यात आलेला कब्जा हक्क दर लावण्यासंदर्भात कारवाई करण्याचे निर्देश याप्रसंगी दिले.  मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या आदेशामुळे मेंढदे ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदनही केले आहे.

एक निवेदन देताना जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष एस. ए. भोईसर, सरचिटणीस डॉ. जगदीश पाटील, अल्पसंख्यांक विभागाचे बी. डी. गवई, तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, नामदेव भोई, सुकलाल सांगळकर, अशोक कांडेलकर, रोहित पोळ, गौरव पाटील, शहर अध्यक्ष पवन खुरपडे हे उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसचे पक्ष संघटन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली बळकट होत असून केंद्र सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे.  गुजरातच्या शेतकऱ्यांना एक न्याय व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एक न्याय असा अन्याय केला जात आहे.  संपूर्ण देश विकायला काढण्याचा धंदा केंद्र सरकारने चालला आहे. महाराष्ट्रात कोरोना अतिवृष्टी महापूर यासारख्या नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर सुद्धा महाराष्ट्र सरकार खंबीर असून शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत 22 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करून महाराष्ट्र सरकारने दिले आहे.  केंद्राकडे 35 हजार कोटी रुपयांचा जीएसटीचा परतावा बाकी असताना महाराष्ट्रातील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी राज्य सरकारविरोधात बोलण्याऐवजी केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना मदत आणून द्यावी व 35 हजार कोटीचा परतावा आणून द्यावा असेही या प्रसंगी वडेट्टीवार म्हणाले.

 

हे वाचायलाच हवे