काँग्रेस केवळ ‘डीलवाली ‘-नरेंद्र मोदी

0

चित्रदुर्ग: काँग्रेस कधीच दिलवाली नव्हती. ती दलितवालीही नव्हती. केवळ डीलवाली होती अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज चित्रदुर्ग येथे आयोजित प्रचार सभेत केली . कर्नाटक विधानसभा रणधुमाळीत काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडू लागल्या आहेत.

चित्रदुर्ग येथे आयोजित प्रचार सभेत नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचा खरपूस समाचार घेतला. काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. जो पक्ष गरिबांचं ‘वेल्फेअर’ करू शकत नाही, त्या पक्षाला जनतेने ‘फेअर वेल’ दिलं पाहिजे, असा टोला मोदींनी लगावला.

दलित समाजात जन्माला आलेल्या थोर वीरांगना वीरा मरकडी यांच्याकडून शौर्य आणि साहस शिकले पाहिजे, असं सांगतानाच ज्यांची जयंती साजरी करायला हवी त्यांची जयंती काँग्रेस साजरी करत नाही. उलट वीरा मरकडी यांना काँग्रेस विसरली असून मतांसाठी सुलतानांची जयंती साजरी करत आहे, अशी टीकाही त्यांनी केली. काँग्रेस कधीच दिलवाली नव्हती. ती दलितवालीही नव्हती. केवळ डीलवाली होती, त्यामुळे आता काँग्रेसला हद्दपार करण्याची वेळ आली आहे, असं मोदी म्हणाले.

काँग्रेसच्या काळात भारत रत्न पुरस्कार केवळ एकाच कुटुंबासाठी राखीव होता. म्हणूनच बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांना पुरस्कार देण्यात आला नाही. त्यांना पुरस्कार देण्याचं काम आम्ही केलं. दिल्ली, महू, मुंबई आणि नागपूरमधील त्यांच्या स्मारकासाठी आमचं सरकार काम करत आहे, असंही ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.