नवी दिल्ली – काँग्रेसने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करण्यात कोणतीच कसर सोडली नसल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. काँग्रेसने डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा नष्ट व्हावा यासाठी प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. त्यांनी हे वक्तव्य नवी दिल्लीतील अलीपूर रोडवर डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या उद्घाटनावेळी बोलताना केले आहे.
इतिहासातून डॉ बाबासाहेब यांच्या सर्व आठवणी पुसल्या जाव्यात यासाठी काँग्रेसने पुरेपूर प्रयत्न केले. हे कठोर सत्य असून बाबासाहेब आंबेडकर जेव्हा जिवंत होते तेव्हा काँग्रेसने त्यांचा अपमान करण्याची एकही संधी सोडली नसल्याचे नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. त्यांच्याकडे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्या सरकारने पूर्ण दुर्लक्ष केले, त्याचबरोबर मंत्रिमंडळातून त्यांना राजीनामा द्यायला लावल्याचेही यावेळी नरेंद्र मोदींनी सांगितले. डॉ बाबासाहेब आंबेडकरांना जवाहरलाल नेहरु यांच्या कार्यकाळात एकाही कॅबिनेट समितीत सहभागी करुन न घेण्यात आल्याने त्यांनी राजीनामा दिला होता.
देशाच्या इतिहासात बाबासाहेबांच्या नावाचा उल्लेख नसावा यासाठी काँग्रेसने आपली पूर्ण शक्ती पणाला लावली. काँग्रेसला माझे आव्हान आहे की, बाबासाहेबांसाठी त्यांनी केलेले एक काम तरी सांगावे. काँग्रेसने त्यांच्या आदरार्थ एक तरी काम केले आहे का ?, असा प्रश्न मोदींनी यावेळी विचारला.
मोदींनी पुढे बोलताना सांगितले की, बाबासाहेब आंबेडकर जेव्हा लोकसभा निवडणूक लढणार होते तेव्हा काँग्रेसने त्यांचा पराभव करण्यासाठी आपली पूर्ण शक्ती पणाला लावली. बाबासाहेबांचा पराभव करण्यासाठी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंनी जोरात प्रचार केल्याचा आरोपही मोदींनी केला.