काँग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदी बाळासाहेब थोरात

0

मुंबई :- माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर रिक्त झालेल्या काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी बाळासाहेब थोरात यांची वर्णी लागली आहे. तर विजय वडेट्टीवार यांची विधानसभेच्या गटनेतेपदी निवड केली आहे. काँग्रेस पक्षाकडून आज शुक्रवारी सकाळी ही घोषणा करण्यात आली. बाळासाहेब थोरात हे राधाकृष्ण विखे-पाटील यांचे कट्टर विरोधक मानले जातात.

लोकसभा निवडणुकीपूर्वी राधाकृष्ण विखे-पाटील यांचा मुलगा सुजय विखे-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळीच बाळासाहेब थोरात यांनी विखेंना नैतिकतेची आठवण करून दिली होती. तसेच राधाकृष्ण विखे हे काँग्रेसशी निष्ठावान आहेत का हे पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे, असा टोलाही लगावला होता.

काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणूगोपाल यांनी या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. आमदार नसीम खान यांच्याकडे विधानसभा उपनेतेपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. बसवराज पाटील यांची मुख्य प्रतोदपदी तर के.सी. पाडवी, सुनील केदार, जयकुमार गोरे, यशोमती ठाकूर आणि प्रणिती शिंदे यांची विधानसभेच्या प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या गटनेतेपदी शरद रणपिसे यांची तर उपनेतेपदी रामहरी रुपनवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या प्रतोदपदी भाई जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुका झाल्यानंतर राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत सर्व पदांचा राजीनामा दिला होता. त्यातच विधानसभा निवडणुकाही जवळ आल्याने काँग्रेसने पक्षांतर्गत फेरबदल करत बाळासाहेब थोरात यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.