ठाणे : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कल्याणमध्ये शिवसेनेला मोठा झटका बसला आहे. शिवसेनेच्या २६ नगरसेवकांसह जवळपास ३०० कार्यकर्त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामे दिले आहेत.
जागावाटपावरून हे नगरसेवक आणि कार्यकर्ते नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. नगरसेवकांनी राजीनामे दिल्याने केवळ शिवसेनाच नव्हे तर भाजपसमोरील अडचणी देखील वाढल्या आहेत. कारण महायुतीत काही ठिकाणी शिवसेनेचाही दबदबा आहे. मात्र, यावेळी काही ठिकाणी भाजपने त्यांचा उमेदवार रिंगणात उतरवला आहे. अशावेळी उमेदवाराला स्थानिक कार्यकर्त्यांच्या विरोधाला सामोरे जावे लागणार आहे.
दरम्यान, या सर्वांनी स्थानिक नेता धनंजय बोडारे यांच्या समर्थनार्थ उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामे दिले आहेत. विधानसभेची उमेदवारी शिवसेनेच्या नेत्याला मिळावी अशी या कार्यकर्त्यांची इच्छा होती. मात्र, जागावाटपात ही जागा भाजपकडे गेली आहे. तसंच पक्षाकडून भाजप नेते गणपत गायकवाड यांना पाठिंबा देण्यास कार्यकर्त्यांना सांगितल्याचं कळतं. त्यामुळंही कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे, असंही सूत्रांकडून समजतं.
