बेंगळूरु – कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री जी परमेश्वरा आणि इतरांशी संबंध असलेल्या जागांवर प्राप्तीकर विभागाने गुरुवारी छापे टाकले. “नीट’ परीक्षेशी संबंधित कोट्यवधी रुपयांच्या कर चुकवेगिरी प्रकरणी हे छापे घालण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. एकूण 30 ठिकाणी छापे टाकून तपासणी करण्यात येत असून पोलिसांव्यतिरिक्त प्राप्तीकर विभागाच्या सुमारे 80 अधिकाऱ्यांची टीम राज्यातील विविध ठिकाणी व राजस्थानातील काही ठिकाणी शोध घेत असल्याचे त्यांनी सांगितले. तुमकुर शहरातील एका ट्रस्टद्वारे संचालित दोन वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये “नीट’ परीक्षांमधील कथित अनियमितता तपासणीच्या भाग म्हणून विभागाने ही कारवाई केली. परमेश्वर हे श्री सिद्धार्थ एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष असल्याचे सांगितले जाते. “नीट’ परीक्षेत बनावटगिरी आणि कथित बेकायदेशीरपणे पेमेंट झाल्यामुळे प्राप्तीकर विभागाने तपासणीस सुरुवात केली आहे. “नीट’ परीक्षेत तोतयेगिरी करणाऱ्या काही विद्यार्थ्यांचा राजस्थानमध्ये शोध घेतला जात आहे.