पोलीस कर्मचारी कापाशी व्यापाराच्या खुनात सहभागी..

 जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

एरंडोल तालुक्यातील फरकांडे येथील कापूस व्यापारी स्वप्नील शिंपी यांची कार पाळधी पेट्रोल पंपाजवळ शुक्रवारी दि. २६ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास तीन दुचाकीवर आलेल्या चौघांनी अडवीत १५ लाखांची रक्कम लुटण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी झालेल्या हल्ल्यात स्वप्नील शिंपी यांचा मृत्यू झाला होता. जळगाव एलसीबीने अवघ्या दोन दिवसात गुन्ह्याचा उलगडा केला असून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

व्हिडीओ बातमी…..👇

पोलीस कर्मचाऱ्याने ५ कोटींची रक्कम असल्याची टीप दिल्याने चौघांनी लुटीचा डाव रचला होता. एलसीबीच्या पथकाने पोलीस कर्मचाऱ्यासह शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चौघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.

जळगाव येथून हवाल्याचे सुमारे १५ लाख रुपये घेऊन जाणाऱ्या एरंडोल तालुक्यातील फरकांडे येथील कापूस व्यापारी स्वप्नील शिंपी यांची कार पाळधी पेट्रोल पंपाजवळ शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास तीन दुचाकीवर आलेल्या चौघांनी अडवली. दुचाकीस्वाराला त्यांच्या कारने उडवल्याचा बहाणा करून पैशांची बॅग हिसकावून नेण्याचा प्रयत्न केला.

व्यापाऱ्याने पैशांच्या बॅगेवरील स्वत:ची पकड सैल होऊ न दिल्यानंतर हल्लेखोरांनी त्यांच्या मांडीवर, पोटावर चाकूने वार केले. तशाही अवस्थेत व्यापाऱ्याने महामार्गावर जोरात पळत बचावाचा प्रयत्न केला. व्यापाऱ्यासह त्याच्यासोबतच्या असलेल्या दिलीप चौधरी याने चारचाकीतून बाहेर पडत मदतीसाठी आरडाओरड केल्याने हल्लेखोरांनी पळ काढला होता. जखमी स्वप्नील शिंपी रस्त्याच्या कडेला पडताच त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतद्वारे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले होते.

रविवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आपल्या मुलाच्या हत्येची सुपारी देण्यात आली आहे. त्यामागे त्याचा सहकारी दिलीप राजू चौधरी हाच असल्याचा संशय स्वप्नील याचे वडील रत्नाकर शिंपी व समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला होता. त्यामुळे पोलिसांवरील दबाव वाढला होता. परंतू खबऱ्यांच्या माध्यमातून एलसीबीच्या पथकाने अखेर पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे.

पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक श्री.चोपडे, सहाय्यक अधीक्षक कृषीकेश रावले, एलसीबीचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्यासह टीमने तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली आहे.

जळगाव जिल्हा पोलीस मुख्यालयातील कर्मचारी असलेल्या एकाने कापूस व्यापारी स्वप्नील शिंपी व दिलीप चौधरी यांच्याकडे १ कोटींची रक्कम असल्याची टीप त्याने दिली होती. पोलीस कर्मचारी आणि आणखी एका अट्टल गुन्हेगाराने संपूर्ण डाव रचला. दोघांनी इतर तिघांना सोबत घेत पाळधीजवळ हल्ला केला. हल्ल्यात रक्कम तर हाती लागली नाही परंतु स्वप्नील शिंपी यांना जीव गमवावा लागला.

दरम्यान, गुन्हा गंभीर असून गुन्हेगार अट्टल आहेत. गुन्हेगारांची ओळख परेड अद्याप बाकी आहे. गुन्ह्यात आणखी संशयितांचा सहभाग असल्याची शक्यता असल्याने अगोदर त्यांची पोलीस कोठडी न घेता न्यायालयीन कोठडी मागण्यात आली आहे. गुन्ह्याचा सखोल तपास आणि आरोपींना ठोस शिक्षा होण्यासाठी आरोपींची नावे प्रसिद्ध करू नये असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here