कडक निर्बंधांचा सदुपयोग; शहरातील मार्केटची साफसफाई

0

जळगाव प्रतिनिधी । सध्या सुरू असणार्‍या कडक निर्बंधांमुळे व्यापारी संकुले बंद असून यामुळे तेथे सध्या कोणताही वर्दळ नाही. याचा उपयोग करून महापालिका प्रशासाने विविध संकुलांच्या साफसफाईस प्रारंभ केला असून यासाठी ९० कर्मचार्‍यांना तैनात करण्यात आल्याची माहिती उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी दिली आहे.

याबाबत वृत्त असे की, सध्या राज्य शासनाने कडक निर्बंध लागू केले असून यात व्यापारी संकुलांमधील सर्व दुकाने बंद करण्यात आलेली आहेत. यामुळे नेहमी मोठ्या प्रमाणात गजबज असणारी शहरातील विविध शॉपींग कॉम्प्लेक्समध्ये अक्षरश: सन्नाटा पसरलेला आहे.

नेहमी वर्दळ असतांना व्यापारी संकुलांमध्ये नियमित स्वच्छता राखण्यासाठी बर्‍याच अडचणी येत होता. मात्र आता निर्बंधांमुळे दुकाने बंद असल्यामुळे महापालिका प्रशासनाने संकुलांच्या स्वच्छतेची मोहिम हाती घेतली आहे. यासाठी अतिरिक्त मनुष्यबळाची आवश्यकता असल्याने प्रत्येक प्रभागातून तीन-चार कर्मचारी घेण्यात येऊन ९० कर्मचार्‍यांचे पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाने जुने आणि नवीन बी. जे. मार्केट आणि महात्मा फुले मार्केटमध्ये स्वच्छता मोहिम राबविली. यात प्रत्येक संकुलातून तीन-चार ट्रॅक्टर इतका कचरा काढण्यात आल्यामुळे ही संकुले चकाचक दिसू लागली आहेत. आज गुरूवारी सकाळी सहा ते दोन या कालावधीत महात्मा फुले मार्केटमध्ये सफाई करण्यात आली. तर शहरातील उरलेल्या मार्केटमध्ये पुढील दिवसांमध्ये स्वच्छता करण्यात येणार आहे.

या संदर्भात माहिती देतांना उपमहापौर कुलभूषण पाटील म्हणाले की, राज्य शासनाने १ मे पर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत. यात सर्व बाजारपेठ बंद राहणार आहे. याआधी बाजारपेठ खुली असतांना पूर्णपणे स्वच्छता करणे हे अतिशय जिकरीचे होते. यामुळे आता दुकाने बंद असल्याने महापालिका प्रशासनाने अतिशय व्यापक मोहिम राबविली आहे. तर आगामी काळात प्रत्येक व्यापारी संकुलाच्या स्वच्छतेबाबत काटेकोर नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती सुध्दा कुलभूषण पाटील यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.