अपघाताची मालिका सुरूच, विचित्र अपघातात तरुणी जागीच ठार; तीन जण जखमी
जळगाव दि.5 –
राष्ट्रीय महामार्गावर आणखी एक बळी! कंटेनरपासून बचाव करताना रिक्षा पलटी होवून रिक्षातील तरुणी विरुद्ध बाजूला फेकली जावून कंटेनरखाली चिरडली गेल्याने जागीच ठार झाली. तर रिक्षाचालकासह तिघेही जबर जखमी झाले आहेत. मयत तरुणी व जखमी विद्यापीठ कर्मचारी आहेत. हा अपघात शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजता बांभोरी पुलानजीक टोल नाक्याजवळ घडला.
बहिणाबाई चौधरी उम विद्यापीठातून संध्याकाळी सहाच्या सुमारास रिक्षाचालक सोनू देवराम पाटील (28) रा. शिवाजीनगर हुडको हे आपली रिक्षा एम. एच. 19 सी. डब्लू. 1556 ने विद्यापीठ कर्मचारी परमेश्वर पांडुरंग थाटे (35) रा. केकत निंभोरा ता. जामनेर,मिनाक्षी विकास बावीस्कर (26) रा. शनिपेठ व श्रेया सुनिल काजळे(24)रा. संभाजी नगर या प्रवाशांना घेवून जळगावकडे येत असताना बांभोरी पुलानजीक टोलनाक्याजवळ इंडिका कारने कट मारल्याने व समोरुन कंटेनर आल्याने रिक्षा चालकाने रिक्षाला टर्न मारता बरोबर रिक्षा डाव्या बाजूला उलटली तर रिक्षातील श्रेया काजळे ही विरुद्ध दिशेला फेकली जावून कंटेनरखाली येवून चिरडली जावून जागीच ठार झाली. रिक्षाही तीनदा उलटल्याने रिक्षातील पद्मेश्वर थाटे, मिनाक्षी बाविस्कर व रिक्षाचालक सोनू पाटील हे जखमी झाले आहेत. जखमींना वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून मयत श्रेया काजळेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आलेला आहे.
श्रेया दोनच महिन्यांपूर्वी रूजू झाली होती
मयत श्रेया काजळे ह्या दोनच महिन्यांपुर्वी विद्यापीठात कंत्राटी पद्धतीत नोकरीला लागल्या होत्या. घटनेचे वृत्त कळताच त्या राहत असलेल्या संभाजी नगरात शोककळा पसरली. त्यांच्या वडीलांसह नातेवाईकांनी वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेतली.
घटनेतील जखमी परमेश्वर थाटे हे उमवितील पत्रकारिता विभागात कार्यरत आहेत. ते विद्यापीठाचे विद्यार्थी असून त्यांनी 2018 मध्ये सुवर्णपदकासह पत्रकारिता पदवी प्राप्त केली आहे. घटनेतील जखमी मिनाक्षी विकास बाविस्कर या दोनच दिवसांपुर्वी विद्यापीठात नोकरीनिमित्त रूजू झाल्याचे नातेवाईकांकडून समजते. त्यांना लक्ष हा साडेतीन वर्षाचा मुलगा आहे. त्या सध्या मुलाच्या शिक्षणामुळे वडीलांकडेच शनिपेठेत वास्तव्यास आहेत.
डॉ.सुधीर भटकर यांनी दिली भेट
जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात ब.चौ.उमविचे पत्रकारिता विभाग प्रमुख डॉ. सुधीर भटकर यांनी भेट देवून मयताचे नातेवाईक व जखमींची विचारपूस केली.