नवी दिल्ली : दिग्गज नेते, सेलेब्रिटी आणि कंपन्यांचे ट्विटर अकाऊंट बुधवारी हॅक करण्यात आल्याने सोशल मीडियात खळबळ माजली आहे. हॅक झालेल्या अकाऊंटमध्ये माइक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स, टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क, अमेरिकी रॅपर कान्ये वेस्ट, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बिडेन, बराक ओबामा, इस्त्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू, वॉरेन बफेट, अँप्पल, उबरसह अन्य ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आले आहेत. ट्विटर हँडल हॅक झाल्यावर त्यावर एक खास मेसेज पोस्ट करण्यात आला. हे संदेश क्रिप्टोकरन्सी घोटाळ्याच्या उद्देशाने केल्याचं समोर आलं आहे. या मेसेजला काही वेळानं ट्वीटर हँडलवरून हटवण्यातही आलं होतं.
हॅकर्सने एका ट्वीट केलं आहे. मला बिटकॉइन्स द्या आणि मी तुम्हाला ते दुप्पट करून देईन. ही ऑफर केवळ 30 मिनिटांसाठी उपलब्ध आहे. तुम्ही एक हजार डॉलर्स पाठवा आणि मी तुम्हाला दोन हजार डॉलर्स करून देईन. ही पोस्ट केल्यानंतर काही मिनिटांमध्ये ट्वीट अकाऊंटवरून हटवण्यात आलं. या व्यक्तींच्या अकाऊंटवर हा मेसेज कोणी केला याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही.
अॅपल, उबर आणि बर्याच कंपन्यांच्या खात्यातूनही बिटकॉइन घोटाळ्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या घटनेनंतर ट्विटरच्या सिक्युरिटीवरही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

ट्विटरने या प्रकरणी माहिती दिली असून सध्या याबाबत काम सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. या नेत्यांच्या ट्विटर हँडल हॅक कसे करण्यात आले याचा तपास सुरू असल्याची माहिती ट्विटरकडून देण्यात आली आहे.


