पंजाब, लोकशाही न्यूज नेटवर्क
अंमलबजावणी संचलनालय (ED) ने मंगळवारी सकाळी पंजाब आणि हरियाणा येथे जवळपास १० ठिकाणी छापे टाकले आहेत. बेकायदेशीर वाळू उपसा प्रकरणातील ही कारवाई करण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार लुधियाना आणि शहीद भगत सिंह नगर येथे पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांच्या पुतण्याच्या मालमत्तेच्या ठिकाणीही छापा पडल्याची माहिती आहे. त्याशिवाय मोहालीच्या सेक्टर ७० मध्ये छापेमारी करण्यात आली आहे.
Enforcement Directorate conducting raids in Punjab in illegal sand mining case. ED searches premises linked to sand mafia Bhupinder Singh Honey, Officials said
— ANI (@ANI) January 18, 2022
सेक्टर ७० मध्ये होमलॅंड सोसायटी येथे झालेल्या छापेमारीच्या कारवाईत सुरक्षा व्यवस्था अतिशय चोख असल्याचे कळते. त्याठिकाणी अनेक नावाजलेले गायक आणि कलाकारांचे वास्तव्य आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मोहालीत अवैध पद्धतीने वाळू उपसा करणाऱ्या भूपिंदर हनीच्या मालमत्तेच्या ठिकाणी छापेमारी झाली आहे. ही व्यक्ती मुख्यमंत्री चन्नीचा नातेवाईक मानली जात आहे. पण या गोष्टीची औपचारिक माहिती मात्र अद्यापही जाहीर करण्यात आली नाही.
Mohali, Punjab | It's very sad to know that raid is being conducted on the premises of Punjab CM Charanjit Singh Channi's relative in connection with a case of illegal sand mining. Punjab CM & his relatives are involved in illegal sand mining: Delhi CM Arvind Kejriwal pic.twitter.com/OhdQYA8OSn
— ANI (@ANI) January 18, 2022
याआधी २०१८ मध्ये ईडीने कुदरतदीप सिंहच्या घरी वाळू उपसाच्या प्रकरणातील कारवाई केली होती. त्यामध्येही हनीचे नाव आले होते. ईडीने सुरू केलेली छापेमारी ही पीएमएलए कायद्यातील तरतुदीनुसार सुरू करण्यात आली आहे. होमलॅंड सोसायटीच्या मॅनेजरने एबीपी न्यूजला दिलेल्या माहितीनुसार सकाळी ८ वाजता ईडीची टीम याठिकाणी दाखल झाली. त्यामध्ये सीआरपीएफचे अधिकारीही होते. त्यानंतर गेटदेखील सील करण्यात आले. या सोसायटीमध्ये भुपेंदर सिंह हनी भाडेकरू आहे. ई़डीच्या अधिकाऱ्यांकडून अद्यापही तपास सुरूच आहे.
पंजाब पोलिसांनी याआधी २०१८ मध्ये अवैध वाळू उपशाच्या मुद्द्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यामध्ये फसवणूकीचे ४२० कलमही लावण्यात आले होते. पण हे प्रकरण नंतर ईडीने टेकओव्हर केले. सुरूवातीला कुदरजीतचे नाव पुढे आले. पण नंतर मुख्य सूत्रधार भूपिंदर हनी असल्याचे समोर आले.
आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमध्ये अवैध वाळू उपशाचा मुद्दा याआधीच मांडला आहे. मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच चमकौर साहिब येथे अवैध पद्धतीने वाळू उपसा होत असल्याचे निदर्शनास आल्याचे केजरीवाल म्हणाले होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना ही बाब माहिती नसणार असे होऊ शकत नाही, असाही आरोप त्यांनी केला.
मुख्यमंत्री चन्नी यांच्यावरही वाळू चोरीचे गंभीर आरोप आहेत. पंजाबलाही माहिती आहे की, ते बेकायदेशीर वाळू उपशाच्या कामाचे मालक आहेत. त्यांच्या सुरक्षेतच हा प्रकार चालतो. पंजाबमध्ये येत्या २० फेब्रुवारीला मतदान आहे. त्याआधीच वाळू उपशाचा मुद्दा आता मोठा होतो आहे. मुख्यमंत्री चन्नी यांनी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सध्या विरोधकांकडून सुरू आहे.