Saturday, January 28, 2023

ऐतिहासिक.. भारताचा 100 कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण

- Advertisement -

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  

जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले असतांना  कोरोना महामारीसोबत लढण्यासाठी १६ जानेवारी २०२१ पासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीमेला सुरुवात झाली. आता मोहीम सुरू होऊन २७८ दिवस पूर्ण झाले आहेत. आज देशात १०० कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण होऊन नव्या विक्रमाची नोंद होणार आहे.

या ऐतिहासिक क्षणानिमित्ताने केंद्र सरकारने जय्यत तयारी केली आहे. दिल्लीतील राम मनोहर लोहियामध्ये आज मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. यादरम्यान केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी नागरिकांना लस घेण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी ट्वीट करून म्हटले की, ‘ज्या लोकांचे लसीकरण अजून बाकी आहे, त्यांनी त्वरित लसीचा डोस घ्या आणि देशातील या सुवर्ण लसीकरण प्रवासात योगदान द्या.’

- Advertisement -

तिरंग्याच्या रुपात रोषणाई

देशात आज १०० कोटी लसीकरण पूर्ण होणार असल्यामुळे देशभरातील १०० ऐतिहासिक वास्तुंना तिरंग्याच्या रुपात विद्युत रोषणाई केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील औरंगाबादचा बिबीका मकबरा, दौलताबाद किल्ला, पुण्यातील शनिवार वाडा, आगा खान पॅलेस आणि सीएसएमटीला तिरंग्याच्या रुपात रोषणाई केली आहे. यामाध्यमातून आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स, लस उत्पादक, वैज्ञानिक यांचा सन्मान करून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांना श्रद्धांजली वाहली जाईल.

दिल्लीच्या एअरपोर्टवर एक खास आउटर कव्हर

आज ऐतिहासिक दिनानिमित्ताने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी १०.३० वाजता आरएमएल रुग्णालयात होणाऱ्या खास कार्यक्रममध्ये सामील होणार आहेत. येथे ते आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत बातचित करतील. शिवाय आरोग्य मंत्री मनसुख मांडविला लाल किल्लाहून कैलाश खेरचे गाणे आणि एक ऑडिओ व्हिज्युअल फिल्म प्रसारित करतील.तसेच आज स्पाइसजेटने १०० कोटींचा लसीकरणाचा आकडा पार होणार असल्यामुळे दिल्लीच्या एअरपोर्टवर एक खास आउटर कव्हर केले आहे. यानिमित्ताने केंद्रीय नागरिक उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि स्पाइसजेटचे सीएमडी आजय सिंह उपस्थितीत असतील.

१०० कोटी लसीकरणाचा टप्पा

यापूर्वी आरोग्य मंत्री मांडविया म्हणाले होते की, ज्यावेळी देशात १०० कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण होईल, त्यावेळी लाउड स्पीकरच्या माध्यमातून विमानं, जहाजं, मेट्रो आणि रेल्वे स्टेशनवर याची घोषणा केली जाईल. बुधवारी संध्याकाळी ७ वाजेपर्यंत देशात ९९.५४ कोटी लसीचे डोस नागरिकांना दिले गेले आहेत. देशातील ७० टक्के नागरिकांना लसीचा एक डोस देण्यात आला असून ३१ टक्के नागरिकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत. तसेच ज्या गावांमध्ये १०० टक्के लसीकरण झाले आहे, तेथे आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी पोस्टर आणि बॅनर लावले पाहिजेत, असे केंद्र सरकारकडून सांगितले आहे.

लसीकरणातील पहिले पाच राज्य

उत्तर प्रदेश – 12,21,40,914

महाराष्ट्र – 9,32,00,708

पश्चिम बंगाल – 6,85,12,932

गुजरात – 6,76,67,900

मध्य प्रदेश – 6,72,24,286

थीम सॉंग लाँच

देशातील लसीकरणाच्या 100 कोटी डोसचा टप्पा ओलांडल्यानंतर त्याचं यश साजरं करण्यासाठी गायक कैलाश खेर यांच्या आवाजात एक थीम सॉंग लाँच केलं जात आहे. आता हे थीम साँग देशभरातील सार्वजनिक ठिकाणी जसं की रेल्वे स्टेशन, मेट्रो स्टेशन, विमानतळ, बस स्टँडवर ऐकायला मिळणार आहे. या थीम साँगबद्दल बोलताना गायक कैलास खेर म्हणाले की, “लसीबाबत देशातील अनेक नागरिकांमध्ये अजूनही निरक्षरता आणि चुकीची माहिती आहे. या थीम साँगच्या माध्यमातून लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल.”

 

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे