मुंबई : राष्ट्रीय नागरिकत्व नोंदवही (एनआरसी) कायद्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपच्यावर जोरदार प्रहार केला आहे. राष्ट्रीय नागरिकत्व नोंदवही (एनआरसी) हा कायदा केवळ मुसलमानांपुरता मर्यादित नाही. त्यामुळे जर भाजपानं हा कायदा अंमलात आणायचा ठरवलं तर त्यामध्ये केवळ मुसलमानच नाही तर हिंदूही भरडले जातील. सर्वच धर्मांतील लोकांना याचा त्रास होईल. हा धर्मनिरपेक्षतेवर घाला घालणारा कायदा आहे. मी मुख्यमंत्री असलो आणि नसलो तरी माझं धोरणं स्वच्छ आहे की मी एनआरसी होऊ देणार नाही. मी कोणालाही कोणाचा अधिकार हिसकावून घेऊ देणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एनआरसीबद्दलची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सामना या वृत्तपत्रासाठी दिलेल्या एका विशेष मुलाखतीत ते बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले, “सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) हा कोणालाही देशातून बाहेर काढण्याचा कायदा नाही. उलट एक कायदा असा आहे ज्याची चर्चा होणार नाही किंबहुना होत नाही. तो म्हणजे एनआरसी. हा कायदा केवळ मुसलमानांपुरता नाही. जर हा कायदा भाजपानं अंमलात आणायचं ठरवलं तर त्याचा केवळ मुसलमानांना त्रास होणार नाही तर तुम्हा-आम्हाला हिंदूंनाही पर्यायानं सर्व धर्मांना त्रास होणार आहे. यामुळं धर्मनिरपेक्षतेवर घाला घातला जाणार आहे. केवळ मुसलमानांच्याच नव्हे तर हिंदुंच्याही मुळावर येणारा हा कायदा आहे. आसामपुरता हा महत्वाचा कायदा आहे. पण संपूर्ण देशात तो येऊ नये. आसाममध्ये १९ लाख लोकांना त्यांचं नागरिकत्व सिद्ध करता आलेलं नाही. त्यातील १४ लाख लोक हे हिंदू आहेत. तिथल्या आमदार-खासदारांचे ते नातेवाईक आहेत.”