नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात असून निवडणूक प्रचारात राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. उत्तर-पश्चिम दिल्लीतील किरारी येथे एका निवडणूक जाहीर सभेत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे.
योगी आदित्यनाथ म्हणाले,’दिल्ली विधानसभेची निवडणूक जवळ येत चालली असता केजरीवाल हनुमान चालिसा म्हणताना दिसत आहेत, एक दिवस असा येईल की एआयएमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी हेही हनुमान चालिसा म्हणताना दिसतील, असे आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.
आदित्यनाथ पुढे म्हणाले, भाजपने अनुच्छेद ३७० आणि अयोध्या प्रकरणाचा उल्लेख केला. आता केजरीवाल हनुमान चालिसा म्हणत आहेत, येत्या काही दिवसांत ओवेसी हनुमान चालिसा म्हणताना तुम्हाला दिसतील, ती वेळ येणारच आहे, असेही आदित्यनाथ म्हणाले.