खामगाव (प्रतिनिधी) कधीकाळी सर्वदूर दृष्टीस पडत असे व तिचा आवाज नित्य कानी पडत असे एवढेच काय तिचे गोडवे कविता व गाण्यांचा माध्यमातून ऐकून आम्ही लहानाचे मोठे कसे झालो हे सुध्दा कळले नाही. अशीही चिऊताई कधी भूरर्र लांब निघून गेली कळलेच नाही. तीन-चार दशकापूर्वी प्रत्येक घरात व अंगणात नांदनारी चिमणी आज तिचा अधिवास कोंक्रीटच्या इमारतीमुळे नामशेष झाला आहे. अशा ह्या चिमणीला पुन्हा मानवी वस्तीत हक्काची जागा,घर व कायम निवारा मिळेल याकरिता येथील जे.सी.आय.खामगाव सिटी व्दारा येथून जवळ असलेल्या गारडगांव या गावी प्रकल्प राबवायला आज दि.२० मार्च जागतिक चिमणी दिवसाच्या निमित्ताने सुरूवात करण्यात आली आहे.
या गावात ब-याचशा प्रमाणात चिमणी दृष्टीस पडते जर या इवल्याशा जीवाला हक्काची घरकुल उपलब्ध करून दिली तर नक्कीच काही महीन्यात या गावात मोठ्या प्रमाणावर चिमणीचे थवे बघावयास मिळतील. असा विश्वास पक्षी प्रेमी कलाध्यापक संजय गुरव यांनी जे.सी.आय.खामगाव सिटी प्रकरण प्रमुख संकेत नावंदर यांचे कडे मांडला व त्यास अगदी सहज संकेत नावंदर यांनी संकल्पाचे स्वरूपात मान्यता देवून आज यास सुरूवात झाली. यावेळी गारडगांव येथील नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होवून कलाध्यापक संजय गुरव यांनी साकारलेले चिमणी घरटे आपल्या अंगणात लावून घेतली. संपूर्ण गांवात यावेळी शंभर पेक्षा जास्त घरटी लावली असून पुढील काळात प्रत्येक घरी एक घरटे लावण्याचा संकल्प जे.सी.आय.खामगाव सिटी यांनी केला आहे.
प्रसंगी गांवकरी सुभाष भागवत यांचे मोलाचे सहकार्य लाभले असून सर्पमित्र- कैलास वैराळे, दिलिप गीते, ग्रा.पं.सदस्य-सुशील वैराळे, वसंत वाडेकर, पवन वाडेकर, गणेश लाघे यांनी घरटी लावण्यात मदत केली व चिमणीचे जुने अधिवास दाखवून त्याचे जवळपासच घरटी लावण्यास प्राधान्य दिले. पर्यावरण प्रेमी सुरेश भोपळे, किशोर भागवत, गौरव इंगळे, यांनी मार्गदर्शन केले. जे.सी.आय.सौ.मिलन नावंदर, सुयोग झंवर, सौ.कल्याणी झंवर; प्रमोद वाघमारे, प्रोफ. विरेंद्र शहा आदिची उपस्थिती लाभली.