एकनाथ खडसेंना देवेंद्र फडणवीसांचा फोन ; म्हणाले..

0

जळगाव : भारतीय जनता पक्ष सोडायला भाग पाडल्याचा वाद कायम असताना माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी त्यांच्या अनुपस्थितीत निवासस्थानी आलेल्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना ‘जेवल्याशिवाय जाऊ नका..’ अशी साद घालत आदरातिथ्य दर्शवले. मात्र, फडणवीसांनी ‘आता नाही, पुढच्या वेळी नक्की जेऊ..’ असे नम्रपणे सांगत खडसेंना प्रतिसादही दिला.

वादळामुळे नुकसान झालेल्या मुक्ताईनगर, रावेर तालुक्यातील भागाची पाहणी करण्यासाठी फडणवीस मंगळवारी (ता.१ जून) जळगाव जिल्ह्यात आले होते. जामनेरहून ते थेट मुक्ताईनगरला गेला. खासदार रक्षा खडसे यांच्या आग्रहाखातर फडणवीस कोथळीत खडसे यांच्या निवासस्थानी चहापानासाठी गेले होते. माजी मंत्री गिरीश महाजन, आमदार संजय सावकारे आदी त्यांच्यासोबत होते. फडणवीस त्याठिकाणी जवळपास अर्धातास होते. तेथेच त्यांनी चहापान घेतले.

देवेंद्र फडणवीस खडसे यांच्या निवासस्थानी कोथळीत पोचले तेव्हा खडसे मुंबईत होते. रक्षा खडसे यांनी त्यांचे स्वागत केले. चहापान सुरु असताना भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी भ्रमणध्वनी करत खडसे व फडणवीसांमध्ये संभाषण घडवून आणले.

फोनवरून नमस्कार चमत्कार झाल्यानंतर खडसे म्हणाले, ‘मी, इकडे मुंबईत आहे.. आपण आलात, आपले स्वागत आहे. मी नसलो तरी जेवल्याशिवाय जाऊ नका..’ या आग्रही विनंतीला फडणवीसांनी ‘आपल्या भागात आलोय. जेवणाचे नियोजन अन्य ठिकाणी आधीच झालेले आहे. पुढच्या वेळी आपल्याकडे नक्की भोजन करेल..’ असे नम्रपणे सांगितले. उपस्थित असलेल्या खासदार रक्षा खडसे, माजी मंत्री गिरीश महाजन, अशोक कांडेलकर आदींनी हा संवाद अनुभवला.

एकनाथ खडसे आता भारतीय जनता पक्षात नाहीत, ते राष्ट्रवादीचे नेते झाले आहेत. फडणवीसांवर नाराजी व्यक्त करत त्यांनी भाजप सोडला आहे. दोघा नेत्यांमध्ये त्यामुळे शाब्दिक वादही झाले आहेत. मात्र, राजकीय मतभेदापलीकडचे संबंध व त्यातून अनुभवायला आलेल्या या आदरातिथ्याची चर्चा जळगाव जिल्ह्यात सध्या सुरू आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.