डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मिरवणूक
जळगाव;- एकता, एकात्मता हा संविधानाचा श्वास आहे. जात-धर्माचे बंध तोडावे लागतील आणि सकारात्मक विचारांचे पालन करावे लागेल तसेच स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही चतुसुत्री अंगीकारून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षीत असलेला राष्ट्रविकास भारतीय संविधानाच्या माध्यमातून साकार करता येईल असे विचार उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आयोजित डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीच्या संयुक्त महोत्सवात आयोजित व्याख्यानाप्रसंगी राज्यशास्त्राचे विश्लेषक हनुमंत निवृत्ती सोनकांबळे(औरंगाबाद) यांनी व्यक्त केले.
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विचारधारा प्रशाळेतर्फे आज दिनांक 14 एप्रिल, 2018 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भारताच्या अंतर्गत व बाह्य सुरक्षे संदर्भात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका या विषयावर हनुमंत निवृत्ती सोनकांबळे यांचे व्याख्यान झाले. यावेळी मंचावर कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील, प्र-कुलगुरू प्रा.पी.पी.माहुलीकर विचारधारा प्रशाळेचे प्रभारी संचालक प्रा.अनिल डोंगरे, विभागप्रमुख प्रा.म.सु.पगारे उपस्थित होते.
प्रारंभी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सकाळी 7.30 वाजता मिरवणूकीस प्रारंभ झाला यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस प्र-कुलगुरू प्रा.पी.पी.माहुलीकर यांनी पुष्पहार अर्पण केला. यानंतर मध्यवर्ती ग्रंथालय इमारतीत कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील यांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी प्र-कुलगुरू प्रा.पी.पी.माहुलीकर, प्रा.म.सु.पगारे, प्रा.जे.बी.नाईक, प्रा.अनिल डोंगरे, डॉ.सुधीर भटकर, डॉ.विनोद निताळे, प्रा.अनिल कुंवर, रमेश शिंदे आदी उपस्थित होते.
श्री. सोनकांबळे यांनी काश्मिर, चिन, श्रीलंका, मालदिव, युनो या प्रातांचे भारताविषयीचे अंतर्गत व बाह्य सुरक्षेबाबत विविध मुद्यांवर तर कलम 370, पंचशिल करार, डोकलाम प्रश्न, सुयश कालवा, फुड बील, पाणी प्रश्न, त्सुनामी आदी विषयावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे दुरदृष्टी असलेले विचार संदर्भांसह मांडले. तसेच या देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी सशक्त बनविण्याचे काम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. भारत हा प्रचंड संख्येने जाती-जातीत विखुरला आहे, भविष्यात भारताकडे राष्ट्र म्हणून बघायचे असेल तर जातीवाद विसरावा लागेल, एकत्र व्हावे लागेल. असे मतही यावेळी त्यांनी व्यक्त केले. डॉ.बाबासाहेब यांनी शेतकज्यांना आधुनिक यंत्र, बी-बियाणे आणि विमा शासनाने मोफत द्यावा, कामगारांवर होणारे शोषण आदी प्रमुख मागण्या केल्या होत्या मात्र त्यांच्या या विचारांवर लक्ष दिले गेले नसल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. तरूणांना उद्देशुन ते म्हणाले की, भविष्यात येणाज्या नेतृत्वावर तरूणांनी विचार करायला हवा, तंत्रज्ञानात प्रगती करायला शिका यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवरही काम करणे आज गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय समारोपात कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील म्हणाले की, राज्यघटनेचे प्रास्ताविक म्हणजेच राष्ट्राच्या ध्येय धोरणाचा जाहिरनामाच होय. संविधानानमुळेच राष्ट्राचा विकास झालेला आहे आणि भविष्यातही होणार आहे, राज्यघटनेतील स्वातंत्र्य, समता, बंधुत्व ही त्रिसुत्री आपल्या देशाच्या विकासाची दिशा स्पष्ट करणारी आहे. तेव्हा आपण राष्ट्र विकासाच्या या वाटचालीत आपले योगदान कशा पध्दतीने देवू शकू याविषयी योग्य विचार करावा असे यावेळी त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.महेंद्र गोडबोले यांनी तर आभार प्रा.म.सु.पगारे यांनी मानले.