नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, हा लॉकडाउन वाढण्याची शंकाही सध्या व्यक्त केली जात आहे. सरकारडून लॉकडाउन वाढवणार नसल्याचं सांगण्यात आलं असलं तरी आता एअर इंडियानं केलेल्या घोषणेमुळं पुन्हा शंका निर्माण झाली आहे. एअर इंडियाने 30 एप्रिलपर्यंत तिकिट बुकिंग बंद केली असून त्यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद असणार आहे. एअर इंडियाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, भारतात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. यामुळेच सरकार लॉकडाउन वाढवण्याचा विचार करत असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, सरकारकडून यावर स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. भारतात आतापर्यंत कोरोनाचे ३ हजाराहून अधिक रुग्ण आढळले असून ६८ जणांचा मृत्यू झाला आहे.