जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवार दि. 23 एप्रिल रोजी मतदान होत आहे. गेले 15 दिवसात निवडणूक प्रचाराचा धुराळा उडाला. रविवारी संध्याकाळपासून जाहीर प्रचाराच्या तोफा थंडावल्या. जळगाव लोकसभा मतदार संघात एकूण 14 उमेदवार रिंगणात असले तरी खरा सामना भाजपचे आ. उन्मेष पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाबराव देवकर यांच्यात होत आहे. तिसरे उमेदवार वंचित बहुजन आघाडीच्या अंजली बाविस्कर असून या दोघांपैकी कुणाची मते खातात यावर बरेच अवलंबून राहणार आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्या लाटेत खा. ए.टी. पाटील हे विक्रमी मते घेऊन विजयी झाले होते. परंतु आता ती परिस्थिती राहिली नाही. त्यातच जळगाव लोकसभा मतदार संघात भाजपने आधी जाहीर केलेले आ. स्मिता वाघ यांची उमेदवारी ऐनवेळी रद्द करून आ. उन्मेष पाटलांना शेवटच्या क्षणी उमेदवारी दिल्याने जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांत संभ्रम पसरला होता. उमेदवारी बदलल्यामुळे भाजपतील गटबाजीला उधाण आले होते. अमळनेर येथे झालेल्या प्रचार सभेत जिल्हा भाजप अध्यक्ष उदय वाघ आणि त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी जो राडा केला. त्याचे पडसाद जिल्हाभरात अद्याप धुमसत आहे. त्यातच तिकिट कापलेले खा. ए.टी. पाटील यांची नाराजी भाजपला भोवणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाबराव देवकर यांची उमेदवारी पक्षाच्या पहिल्या यादीतच जाहीर झाल्यामुळे सुरुवातीपासून त्यांनी संपूर्ण मतदार संघ पिंजून काढला आहे. भाजपचे उन्मेष पाटील यांना प्रचारासाठी कमी कालावधी मिळाला. तरी सुद्धा मतदार संघात जळगाव आणि अमळनेर येथे मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेने वातावरण बसलले आहे. भाजपचे संकटमोचक जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे नेतृत्वात तालुकास्तरावर भाजप – शिवसेना कार्यकर्त्यांच्या झालेल्या मेळाव्याने चित्र बदलले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शरद पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील, धनंजय मुंडे आदिंच्या सभा झाल्या.
गेल्या 15 दिवस भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रचार शिगेला पोहोचला होता. जळगाव शहरात सर्वाधिक म्हणजे 3 लाख 80 हजार 734 इतके मतदान झाले आहे. जळगाव ग्रामीणमध्ये 3 लाख 12 हजार 621 इतके मतदान आहे. त्यामुळे जळगाव शहर आणि ग्रामीण मधून जो उमेदवार सर्वाधिक मतदान घेईल तो बाजी मारेल जळगाव शहरात भाजप शिवसेनेचे वर्चस्व आहे. महानगरपालिकेतील एकूण 75 नगरसेवकांपैकी 3 एमआयएमचे वगळले तर एकूण 72 नगरसेवक भाजप सेनेचे आहेत. त्यामुळे शहरात भाजप – शिवसेना संघटनेचा फायदा भाजप उमेदवाराला मिळू शकतो. या उलट राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचा एकही नगरसेवक महानगरपालिकेत निवडून येऊ शकला नाही ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीने चिंतेची बाब म्हणता येईल. तथापि जळगाव शहराच्या विकासासाठी भाजपने काहीही केले नाही. जळगावकरांच्या तोंडाला पाने पुसली असा आरोप राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर यांनी त्यांच्या प्रचार सभातून केला आहे. शिवाजीनगर उड्डाण पुलामुळे शिवाजीनगर वासीयांची झालेली कोंडी हा मुद्दा गुलाबराव देवकरांनी घेतला परंतु नगरपालिकेत व महापालिकेत सत्तेवर असतांना त्यांनी काय केले? असा प्रति प्रश्नही भाजपतर्फे करण्यात येतो त्याचबरोबर घरकुल घोटाळ्याात देवकरांवर खटला दाखला झाला याचेही भांडवल भाजप करीत आहे. परंतु गुलाबराव देवकर हे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री असतांना
केलेल्या विकेस कामांच्या यादीत धरणगावचे उड्डाण पूल, बहिणाबाईंचे स्मारक, बालकवींचे स्मारक आदिंचा समावेश असल्याचे सांगतात.
गुलाबराव देवकर यांचा सुरुवातीपासून सुत्रबद्धरीतीने नियोजनपूर्वक प्रचार हे वैशिष्ट्यो म्हणता येईल. त्या तुलनेत उन्मेष पाटलांचा प्रचार विस्कळीत होता. तरी पण भाजप- सेनेचे संघटन त्यांच्या उपयोगी पडणार आहे. तशा प्रकारच्या संघटनामध्ये देवकर तुलनेने कमी पडतात. जातीय समीकरणाचा विचार केला तर लेवा पाटील समाजाची मते देवकरांकडे जाण्याचा कल दिसत आहे. कारण माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी मंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आ. उन्मेष पाटील आनंदाने डान्स करीत असल्याचे फोटोग्राफ्स व्हायरल झाले आहे. जिल्हाभरात सर्वत्र या फोटोची चर्चा आहे. त्यामुळे लेवा समाजात एकनाथराव खडसे यांना एकस्थान आहे. त्यामुळे आ. उन्मेष पाटलांच्या या कृत्यामुळे लेवा समाज नाराज असल्याचे बोलले जाते. आ. उन्मेश पाटील आणि गुलाबराव देवकर हे दोन्ही उमेदवार मराठा समाजाचे असल्याने मराठा समाजाची दोघांमध्ये विभागणी होईल असे चित्र दिसते. वंचित बहुजन आघाडीच्या अंजली बाविस्कर या दलित मागासवर्गीयांची म्हणजे गुलाबराव देवकरांची मते खातील हे स्पष्ट आहे.
आ. उन्मेष पाटील हे तरूण अभ्यासू उमेदवार असून आमदारकीची कारकीर्दीत त्यांनी चाळीसगाव तालुक्यात विकासाची कामे केली आहेत. अद्याप तरी त्यांची कोरी पाटी असून त्यांना कसला डाग लागला नाही. गुलाबराव देवकर हे येष्ठ अनुभवी उमेदवार आहेत. सर्वांशी मिळून मिसळून वागणारी व्यक्ती म्हणून ते परिचित आहेत. पालकमंत्री असतांना त्यांनी जिल्ह्यात विकासाची चांगली कामे केली आहेत. घरकूल घोटाळ्यााचा फक्त त्यांना डाग लागला आहे. जळगाव ग्रामीण, अमळनेर, चाळीसगाव, एरंडोल या तालुक्यात गुलाबराव देवकरांसाठी वातावरण चांगले आहे. चाळीसगावमध्ये आ. उन्मेष पाटलांना स्थानिक भाजपतील गटबाजीचा फटका बसण्याची शक्यता आहे.
भाजपचे आ. उन्मेष पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाबराव देवकर यांच्यात काट्याची लढत होणार असल्याचे आजतरी स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. भाजपचे संघटन राष्ट्रवादीपेक्षा मजबूत असून भाजपचे संकटमोचक म्हणून परिचित असलेले जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भूमिका या दोन दिवसात महत्वाची आणि निर्णायक ठरणार आहे.
दोघे चाळीसगाव तालुक्याचे
भाजपचे उमेदवार आ. उन्मेष पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाबराव देवकर हे दोघेही चाळीसगाव तालुक्याचे रहिवासी आहेत. चाळीसगाव तालुक्यात धुळे जिल्ह्याच्या सिमेवर असलेले दरेगाव हे आ. उन्मेष पाटलांचे गाव तर याच गावाजवळ असलेले पळासरे हे गुलाबराव देवकर यांचे गाव आहे. दरेगाव आणि पळासरे हे दोन्ही गावांमधून धुळे रोड गेलेले आहे. रोडच्या एका बाजुला दरेगाव तर दुसर्याा बाजुला पळासरे आहे.
रिंगणातील उमेदवार
1) उन्मेष भय्यासाहेब पाटील- भाजप, 2) गुलाबराव बाबुराव देवकर – राष्ट्रवादी काँग्रेस, 3) राहुल नारायण बनसोडे – बसपा, 4) श्रीमती अंजली रत्नाकर बाविस्कर – वंचित बहुजन आघाडी, 5) ईश्वर नयाराम मोरे -बहुजन मुक्ती पार्टी, 6) मोहन शंकर बिर्हाडे – राष्ट्रीय समाजवादी पार्टी, 7) शरद गोरख भामरे – राष्ट्रीय जन शक्ती, 8) संत श्री बाबा महाहंसजी महाराज पाटील – हिंदुस्थान निर्माण दल, 9) अनंत प्रभाकर महाजन – अपक्ष
10) ओंकार आबा चेनसिंग जाधव – अपक्ष, 11) मुकेश राजेश कुरील – अपक्ष, 12) गौरी शंकर शर्मा – अपक्ष, 13) सुभाष शिवलाल खैरनार – अपक्ष, 14) संचेती रूपेश पारसमल- अपक्ष,
मतदार संख्या
पुरुष – 10.01,249
महिला – 9, 08,427
इतर – 59
एकूण – 19,09,735
– धों.ज.गुरव
९५२७००३८९१)