जळगाव :- लोकसभा निवडणुकीची सध्या राजकीय धामधूम सुरू आहे. दरम्यान जळगाव लोकसभा मतदारसंघात वेळेत खर्च सादर न केल्याने, जास्त खर्च दाखविल्याने, खर्चाचा ताळमेळ न जुळल्याने पाच उमेदवारांसह तीन अर्ज मागे घेतलेल्या इच्छुक उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी कारणे दाखवा नोटीसा बजावल्या आहेत. त्यात खुलासे न दिल्यास कारवाईचा इशाराही त्यांनी दिला आहे.
आ.उन्मेष पाटील व गुलाबराव देवकरांनाही बजावल्या नोटीसा
भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार उन्मेष पाटील यांनी सादर केलेल्या खर्चातील सहा लाखांचा हिशेब न जुळल्याने त्यांना नोटीस दिली आहे. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस महाघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांनी प्रचारासाठी वाहनांचा दिलेला दर व आयोगाने ठरवून दिलेला दर यात फरक असल्याने त्यांनाही नोटीस दिले आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार अंजली रत्नाकर बाविस्कर यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर बँकेच्या खात्यातून खर्च करणे अपेक्षित होते. त्यांनी स्वत:जवळील रोख रक्कम खर्च केली. त्यामुळे त्यांनीही नोटीस दिली गेली आहे. अपक्ष उमेदवार सुभाष शिवलाल खैरनार, संचेती रुपेश पारसमल यांनीही निवडणूक खर्च सादर केलेला नसल्याने नोटीस दिली आहे. तसेच उमेदवारी अर्ज मागे घेतलेल्या आ.स्मिता वाघ, डॉ.सतीश भास्करराव पाटील, प्रदीप भीमराव मोतीराया यांना अर्ज भरल्यानंतर ते माघारीपर्यंतचा झालेला खर्च सदर केलेला नसल्याने त्यांना नोटीसा बजावल्या आहेत.