उत्तर भारतात थंडीची लाट, महाराष्ट्र गारठणार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  

उत्तर भारतात थंडीची लाट आली असून त्यामुळं येत्या काही दिवसांत महाराष्ट्रामध्येही तापमानाचा पारा तीन ते चार अंशांनी घसरणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये आधीच तापमान शून्याच्या खाली पोहोचलंय. शिमल्यामध्ये तर काल उणे दोन अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. या हिवाळ्यात काल शिमल्यामध्ये सर्वात थंड दिवसाची नोंद झाली. दरम्यान  गुजरात राज्यांमध्ये तापमानात कमालीची घट होण्याची शक्यता आहे.

हिमाचल प्रदेशच्या लाहुल-स्पिती या भागात बर्फवृष्टी होत आहे. उत्तरेकडच्या थंड वाऱ्यामुळे तापमान कमालीचं घसरलंय. लडाख भागातही तापमानाचा पारा इतका घसरलाय की तलावही गोठून गेले आहेत.  पुढील काही दिवसांत, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये थंडी वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर थंडीची लाट महाराष्ट्राचाही पारा कमी करेल असा अंदाज आहे.

महाराष्ट्रात परभणी, हिंगोली, वाशिम जिल्ह्यात तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. हिंगोली जिल्ह्यातील तापमानात प्रचंड घट झाली आहे. परिणामी जिल्हाभरात थंडीची लाट पसरली आहे दिवसभर वातावरण थंड असून थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक ऊबदार कपडे वापरत आहेत.

परभणी जिल्ह्यातील तापमान 10 अंशापर्यंत खाली आहे. त्यामुळे नागरिक ठिकठिकाणी शेकोटी पेटवून उब घेताना दिसत आहेत. वाशिममध्येही गेल्या काही आठवड्यापासून गायब झालेल्या थंडीने परत जोर धरला आहे. वाशिम जिल्ह्यात 14℃ पर्यंत पारा खाली घसरला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here