लखनऊ : उत्तर प्रदेशच्या मऊ जिल्ह्यामध्ये सिलेंडर स्फोट झाला असून या स्फोटामुळे एक इमारत कोसळल्याने ११ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर 30 जण जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. मोहम्मदाबादच्या वलीदपूर गावामध्ये ही घटना घडली आहे. जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये महिलांसह लहान मुलांचा समावेश आहे.
सकाळी पावणे सातच्या सुमारास स्वयंपाकघरात नाश्ता बनवत असताना अचानक सिलेंडचा स्फोट झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. या स्फोटामुळे दुमजली इमारत कोसळली. या दुर्घटनेमध्ये 10 जणांचा मृत्यू झाला तर 30 जण जखमी झाले. जखमींमधील अनेक जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी आजमगड येथे हलवण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकले असून त्यांना बाहेर काढण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दु:ख व्यक्त केले. जखमींना ताबडतोब मदत करण्याचे आदेश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.