सेऊल : उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग-उन हे सध्या मृत्यूशी झुंज देत असल्याचे सांगण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर किम जोंग यांची प्रकृती खालावत असल्याचे वृत्त आहे. किम जोंग यांच्या प्रकृतीबाबतच्या वृत्तामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. अमेरिकन वृत्तवाहिनी सीएनएनने याबाबतचे वृत्त दिले आहे.
अमेरिकन गुप्तचर संस्था उत्तर कोरियातील घडामोडींवर लक्ष ठेऊन आहेत. एका अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितले की, किम यांची प्रकृती मागील काही महिन्यांपासून ठिक नव्हती. लठ्ठपणाचा त्यांना त्रास होता. त्याशिवाय अति धुम्रपानाच्या आहारी ते गेले होते. किम हे ११ एप्रिल रोजी दिसले होते. इतकंच नव्हे किम यांचे आजोबा आणि उत्तर कोरियाचे दिवंगत नेते किम उल संग यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या १५ एप्रिलच्या कार्यक्रमात त्यांची अनुपस्थिती होती. किम यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती या अधिकाऱ्याने दिली.
किम जोंग उन यांच्यावर हयांगसान येथील एका ठिकाणी उपाचर सुरू असल्याचे म्हटले जात आहे. तसेच त्यांच्या ब्रेन डेड झाल्याच्या चर्चांववर अमेरिकेतील अधिकाऱ्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तर उत्तर कोरियातून कोणतीही योग्य माहिती मिळणे अवघड असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, आपल्या आजोबांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते सहभागी झाले नव्हते यावरून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. “गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीच्या अनेक अफवांना उधाण आले होते. जर ते रुग्णालयात असतील तर यावरून ते १५ एप्रिलच्या कार्यक्रमात का सहभागी नव्हते याचे उत्तर मिळते,” असे मत उत्तर कोरियाच्या प्रकरणांचे जाणकार ब्रुस क्लिंगर यांनी सांगितले.