नवी दिल्ली :- लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा अंतिम टप्पा संपल्यानंतर रविवारी संध्याकाळी एक्झिट पोलचे अंदाज आल्यानंतर विरोधकांनी ईव्हीएम मशिनवर संशय व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. व्हीव्हीपॅट मतदानाची 100 टक्के मतमोजणी करावी अशी मागणी करणारी याचिका विरोधकांनी सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाकडे केली होती. सर्व ईव्हीएम मशीनमध्ये व्हीव्हीपॅट लावण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे, तर उत्तर प्रदेशातील ईव्हीएमच्या सुरक्षेबाबत विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना निवडणूक आयोगाने केराची टोपली दाखवून मोठा झटका दिला आहे.
टेक्नोक्रॅट्सच्या एका ग्रुपने सर्वोच्च न्यायालयात ही याचिका सादर केली होती. व्हेरिफिकेशनसाठी सर्व ईव्हीएममध्ये व्हीव्हीपॅट सुविधा देण्यात याव्यात, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली होती. न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली होती. ही मागणी मेरिटवर आधारित नाही, असं सांगून न्यायालयाने याचिका फेटाळून लावली आहे.