नवी दिल्ली:
भारतातील निवडणूक प्रक्रियेत मोठे बदल होण्याची शक्यता असून इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनऐवजी (ईव्हीएम) पुन्हा एकदा मतपत्रिकेद्वारे मतदान घेतलं जाण्याची चिन्हं आहेत. मतदान प्रक्रियेतील फेरफाराच्या सततच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर भाजपनं यावर गांभीर्यानं विचार सुरू केला आहे. सर्व पक्षांचं एकमत झाल्यास निवडणूक प्रक्रियेतून ईव्हीएम मशिन हद्दपार करण्याची तयारी असल्याचं भाजपनं म्हटलं आहे.
भविष्यातील निवडणुकांमध्ये मतपत्रिकांचा वापर करावा, अशी मागणी देशातील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसनं निवडणूक आयोगाकडं केली आहे. त्यानंतर भाजपनंही आपल्या भूमिकेत बदल केला आहे. भाजपचे सरचिटणीस राम माधव यांनी एएनआयशी बोलताना या मुद्द्यावर भाजपची भूमिका मांडली. ‘प्रत्येक पक्षाला वाटत असेल तर पुन्हा मतपत्रिकांकडं वळण्यास भाजपची हरकत नाही. मात्र, त्यावर सर्व बाजूंनी चर्चा होण्याची गरज आहे. मतपत्रिकेकडून ईव्हीएम मशिनकडं वळण्याचा निर्णय सर्वसहमतीनं घेण्यात आला होता, हे काँग्रेसनं विसरू नये,’ असंही माधव म्हणाले.