मुंबई :- कोहिनूर मिल प्रकरणात झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांना सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) नोटीस बजावण्यात आली आहे. २२ ऑगस्ट रोजी त्यांना चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, मनसे अशा नोटीशीला भीक घालत नाही अशी पहिली प्रतिक्रिया मनसेचे नेते आणि प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी या प्रकरणाबद्दल बोलताना दिली आहे.
गेल्या पाच सहा वर्षात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून भाजपाच्या कुठल्या नेत्याची ईडीची किंवा सीबीआयची चौकशी झाली का? यांचे नेते तुरुंगात बसून जे पिडीत आहेत त्यांच्यावर ट्रक घालतात, त्यांचा खून करण्याचा प्रयत्न करतात त्यांची कुठलीही चौकशी होत नाही. मुंबई बँकेचा घोटाळा, प्रकाश मेहतांचा घोटाळा या कुठल्याही प्रकरणात चौकशी झाली नाही. सरकारला फक्त राज ठाकरेच आठवतात. कोहिनूर मिलचं प्रकरण अतिशय जुनं आहे. इतकी वर्ष झाल्यानंतर सरकारला आताच का जाग आली?,” असा सवाल देशपांडे यांनी उपस्थित केला.