मुंबई : इथिओपियाचे पंतप्रधान अबीय अहमद अली यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्रांसोबत असणारे सीमावादाचे प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवण्यासाठी अली यांनी उचललेली पावलं आणि शांततापूर्ण मार्गांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर राबवलेल्या काही उपक्रमांसाठी त्यांच्या नावे हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराच्या निमित्ताने इथिओपियामद्ये शांतता राखण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्यांचाही गौरव होत असल्याचं नोबेलच्या संकेतस्थळावर म्हटलं गेलं आहे. ‘२०१८ मध्ये अली जेव्हा पंतप्रधानपदी आले तेव्हा एरिट्रीयासोबत Eritrea शांततापूर्ण चर्चा पुन्हा सुरु करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती’, असंही या संकेतस्थळावर नमूद करण्यात आलं. ज्या माध्यमातून अली यांनी कशा प्रकारे शांततेच्या मार्गाने दोन देशांमधील वाद निकाली काढला यावर प्रकाशझोत टाकला. शिवाय या पुरस्काराच्य़ा निमित्ताने Abiy Ahmed Ali त्यांचं हे काम असंच सुरु ठेवतील अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.