मुंबई : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण झाली आहे. मात्र पेट्रोलियम कंपन्यांनी तूर्त इंधन दर जैसे थेच ठेवले आहेत. सलग सहा दिवस इंधन दरात कोणताही बदल केला नाही. त्यामुळे ग्राहकांना तूर्त दिलासा मिळाला आहे.

आज बुधवारी मुंबईत पेट्रोलचा भाव ९६.८२ रुपयांवर स्थिर आहे. डिझेलचा भाव ८७.८१ रुपये आहे. दिल्लीत आज एक लीटर पेट्रोल ९०.४० रुपये आहे. डिझेलचा भाव ८०.८३ रुपये झाला आहे. चेन्नईत आजचा पेट्रोलचा भाव ९२.४३ रुपये झाला आहे. डिझेलसाठी ८५.७३ रुपये भाव आहे.
कोलकात्यात आज पेट्रोलचा भाव ९०.६२ रुपये झाला आहे. डिझेलचा भाव ८३.६१ रुपये आहे. बंगळुरात पेट्रोल ९३.४३ रुपये असून डिझेल ८५.६० रुपये झाला आहे. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये आतापर्यंतचा डिझेलचा सर्वाधिक ८८.९८ रुपयांचा विक्रमी दर आहे. तर पेट्रोल दर ९८.४१ रुपये आहे. सहा दिवसांपूर्वी पेट्रोल १६ पैसे आणि डिझेल १४ पैशांनी स्वस्त झाले होते.
अमेरिका आणि युरोपात पुन्हा एकदा करोनाचा कहर वाढत आहे. भारतात मागील आठवडाभरापासून करोना रुग्णसंख्येने दोन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर लाॅकडाउनची शक्यता वाढली आहे.

