मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी सलग आठव्या दिवशी इंधन दरात वाढ केली आहे. आज मंगळवारी देशभरात पेट्रोल ३० पैसे तर डिझेल ३५ पैशानी महागले आहे. दरम्यान, गेल्या दहा महिन्यात पेट्रोल आणि डिझेलमध्ये मोठी दरवाढ झाली आहे. यामुळे ग्राहकांचे कंबरडे मोडले आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींनी वर्षभराचा उच्चांकी स्तर गाठला आहे.
आजच्या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोलचा भाव ९५.७५ रुपये झाला आहे. मुंबईत एक लीटर डिझेलसाठी ग्राहकांना आता ८६.७२ रुपये मोजावे लागतील. राज्यात परभणीमध्ये पॉवर पेट्रोलचा भाव १०० रुपयांवर गेला आहे. सलग आठ दिवस केलेल्या दरवाढीने पेट्रोल आणि डिझेल सरासरी दोन रुपयांनी वाढले आहे.
दिल्लीत आज एक लीटर पेट्रोल ८९.२९ रुपये झाले आहे. डिझेलचा भाव ७९.७० रुपये झाला आहे. चेन्नईत आजचा पेट्रोलचा भाव ९१.४५ रुपये झाला आहे. डिझेलसाठी ८४.७७ रुपये भाव आहे. कोलकात्यात आज पेट्रोल ९०.५४ रुपये झाले आहे. डिझेलचा भाव ८३.२९ रुपये झाला आहे.बंगळुरात पेट्रोल ९१.२८ रुपये असून डिझेल ८४.४९ रुपये झाला आहे.
गेल्या दहा महिन्यात पेट्रोल आणि डिझेलमध्ये मोठी दरवाढ झाली आहे. यामुळे ग्राहकांचे कंबरडे मोडले आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींनी वर्षभराचा उच्चांकी स्तर गाठला आहे. आज ब्रेंट क्रूडचा भाव ६३.३० डॉलर असून त्यात ०.८७ डॉलरची वाढ झाली. तर सिंगापूर क्रूड ऑइल एक्सचेंजमध्ये कच्च्या तेलाचा भाव ०.६९ डॉलरने वधारला आणि ६०.१६ डॉलर झाला.
दरम्यान, इंधन दरवाढीचे परिणाम दिसू लागले आहेत. जानेवारी महिन्यात घाऊक मूल्यावर आधारित महागाई दरात वाढ झाली आहे. महागाई वाढण्यास इंधन दरवाढ कारणीभूत ठरली आहे. तसेच नजीकच्या काळात महागाई आणखी वाढेल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. अनेक शहरांत पॉवर पेट्रोलने १०० रुपयांची पातळी ओलांडली आहे.

