आ. मंगेश चव्हाण यांची चाळीसगाव कोविड सेंटरला भेट

0

रुग्णाची ऑक्सिजन लेव्हल १५ मात्र तातडीने हलविण्यासाठी असणारी रुग्णवाहिका ५ दिवसांपासून पंक्चर…

४० रुग्णांसाठी केवळ २ कर्मचारी,  अस्वच्छता व देखभाल बाबत यापूर्वीच तक्रार…

चाळीसगाव : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत चाळीसगाव हॉटस्पॉट बनत असताना लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या कोविड सेंटर येथे रुग्णांची होणारी वाताहात व सेंटरची झालेली दुरावस्था आमदार मंगेश चव्हाण यांच्या सरप्राईज व्हिजिट ने उघड झाली आहे.

काल दि.१३ मार्च रोजी रात्री चाळीसगाव येथील कोविड सेंटर येथून एका रुग्णाच्या तब्बेतीसंदर्भात पवार नामक व्यक्तीचा आमदार मंगेश चव्हाण यांना फोन आला असता रात्री साडेबारा वाजता आमदार चव्हाण हे कोविड सेंटर येथे दाखल झाले. त्यावेळी जे अतिशय विदारक असे चित्र कोविड सेंटरमध्ये दिसून आले त्याने रुग्णांशी सुरू असलेला जीवघेणा खेळ उघडकीस आला. राखुंडे नामक रुग्णाची ऑक्सिजन लेव्हल १५ वर आलेली असताना त्यांना हलवण्यासाठी शासनाने जी कार्डियाक रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे ती गेल्या ५ दिवसांपासून पंक्चर झालेली आढळली. शासन सदर कार्डियाक रुग्णवाहिकासाठी दरमहा भरमसाठ भाडे देत असताना सदर रुग्णाला साध्या व्हॅन मध्ये हलविण्यात येत होते.

तसेच त्यावेळी कोविड सेंटर येथे ४० हुन अधिक कोविड रुग्ण उपचार घेत असताना केवळ दोनच कर्मचारी त्याठिकाणी उपलब्ध असल्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केलेल्या पाहणीत उघडकीस आले. आमदार मंगेश चव्हाण यांच्या पुढाकाराने मोठ्या दातृत्वभावनेने चाळीसगाव तालुक्यातील दानशूर व्यक्तींनी दिलेल्या ५० लाखांहून अधिक मदतीने हे कोविड रुग्णालय व त्यातील साहित्य उभे केले होते. मात्र त्यांची देखभाल दूरची बाब आहे जी जिवंत माणसे त्याठिकाणी उपचार घेत आहेत त्यांच्याकडे देखील लक्ष द्यायला कुणी नसल्याने आमदार चव्हाण यांनी संताप व्यक्त केला. आज कोविड येऊन एक वर्ष झाला तरी आपली आरोग्य व्यवस्था सुधारत नसेल तर शासन जो कोट्यवधीचा निधी खर्च करत आहे तो नेमका जातो कुठे हा प्रश्न निर्माण होतो. आमदार मंगेश चव्हाण यांनी मागील वर्षीच चाळीसगाव येथील कोविड सेंटर येथे जास्तीतजास्त कर्मचारी उपलब्ध करून द्यावे यासाठी जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता मात्र त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले, तसेच येथील स्वच्छता व देखभाल बाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने आमदार मंगेश चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वीच कोविड सेंटरला प्रत्यक्ष भेट देऊन व तसेच लेखी पत्र देऊन सूचना दिल्या होत्या. कोविड काळात आरोग्य यंत्रणेने चांगले काम केले याबाबत दुमत नाही मात्र लोकप्रतिनिधी यांच्या सूचनांची दखल घेतली जात नसेल तर मलाही लोकांच्या आरोग्यासाठी कठोर भूमिका घ्यावी लागेल असा इशारा देत जर प्रशासन व  आरोग्य यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे एखाद्या रुग्णाचा जीव जाणार असेल तर यास संबंधित कोविड रुग्णालयाचे विभाग प्रमुख जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी मी आरोग्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, सिव्हील सर्जन यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे आमदार चव्हाण यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.