आ.किशोर पाटलांनी नुकसानीबाबत विधानसभेत प्रश्न मांडतांना शेतकऱ्यांची दिशाभुल केली – मा. आमदार दिलीप वाघ
पाचोरा – भडगांव तालुक्यात ११ जुनला झालेल्या वादळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांच्या केळी व नव्याने लावलेल्या कापुस पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यावर आमदार किशोर पाटील यांनी नुकसान भरपाई मिळण्यासाठी विधानसभेत प्रश्न मांडला तो स्वागताहर्य असुन नुकसान झालेले केळीचे पिक हे वार्षिक किंवा बहुवार्षिक मध्येही मोडले जात नाही. आमदार पाटील यांना याबाबत पुरेशी माहिती किंवा ज्ञान नसल्याने मुख्यमंत्र्यांनी उत्तर देताना झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून प्रस्थाव विमा कंपनी मार्फत केंद्र शासनाकडे पाठविणार असल्याचे सांगितले. मात्र शेतकऱ्यांचा विमा कंपन्यांवर विश्वास राहिलेला नसल्याने अनेक शेतकरी पिक विमा घेत नाही. याशिवाय शेतकऱ्यांना हेक्टरी किती मदत मिळावी व कधी मिळणार ? याबाबतचे स्पष्ट आश्र्वासन मुख्यमंत्री यांनी दिलेले नाही. याशिवाय तीन महिन्यांनंतर विधानसभेच्या निवडणुका लागणार असल्याने आमदार पाटील यांनी शेतकऱ्यांची दिशाभुल केल्याचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
मा. आमदार दिलीप वाघ यांनी त्यांचे निवासस्थानी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी पी.टी.सी. चे चेअरमन संजय वाघ, जिल्हा प्रवक्ते खलील देशमुख, विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन तावडे, तालुका अध्यक्ष विजय पाटील, शहर अध्यक्ष सतिष चौधरी, नगरसेवक विकास पाटील, रणजीत पाटील, डॉ. योगेश पाटील उपस्थित होते. पत्रकार परिषदेत बोलताना वाघ यांनी सांगितले की, दि. ११ रोजी भडगांव तालुक्यातील निंभोरा, बोदर्डे, पांढरद, कनाशी, पिंप्री हाट, लोण, बात्सर व पिचर्डे येथे वादळी पाऊस तर काही ठिकाणी गारांचा पाऊस झाला होता. यामुळे शेतकऱ्यांचे केळी पिकांचे व नव्याने लावलेल्या कापुस पिकांचे मोठे नुकसान झाले. दि. १२ रोजी मी स्वत:, प्रांताधिकारी राजेंद्र कचरे पाटील, तहसिलदार गणेश मरकड व कृषी अधिकाऱ्यांनी पाहणी करून पंचनामे करण्यास सुरुवात केली. त्यानंतर १४ तारखेला पालकमंत्री ना. गिरीष महाजन यांनी पाहणी केली. यात केळी पिकांचे मोठे नुकसान झाल्याने केळी पिक हे वार्षिक व बहुवार्षिक मध्येही मोडले जात नसुन ते फळबागात मोडले जाते. परंतु शासनाकडुन अद्याप केळीला फळबागाचा दर्जा मिळालेला नाही. आमदार पाटील यांनी आईकीव माहितीवरुन प्रश्न विचारल्याने शेतकऱ्यांना हेक्टरी किती नुकसान भरपाई मिळणार व कधी मिळणार याबाबतही स्पष्ट होत नाही. यासाठी आमदार किशोर पाटील यांनी वादळामुळे झालेल्या नुकसानीची विशेष बाब म्हणून मदत मिळण्यासाठी प्रश्न मांडायला हवा होता. मार्च – २०१४ मध्ये बांबरुड (राणीचे) व परिसरात अशाच प्रकारे नुकसान झालेले असतांना आम्ही पाठपुरावा करून शासनाकडुन केळीला १२ हजार रुपये व विशेष बाब म्हणून १३ हजार रुपये असे हेक्टरी २५ हजार रुपये अनुदान दिले होते. आमदार किशोर पाटील यांनी थेट विधानसभेत हा प्रश्न लावुन धरल्याने त्यास विशेष बाब म्हणून तातडीच्या मदतीची मागणी करायला हवी होती. मात्र त्यांनी प्रश्न व्यवस्थीत न मांडल्याने मुख्यमंत्री यांनी विमा कंपनीला पुढे करुन वेळ मारुन नेली. शासन झालेल्या नुकसानीचे ८ हजार ६०० रुपये, १० हजार रुपये व १८ हजार रुपये अशा स्वरुपाचे हेक्टरी नुकसान भरपाई देते. मात्र शेतकऱ्यांना केळीचे झाड उभे करण्यासाठी ५० ते ६० हजार रुपये खर्च येतो. प्रश्न मांडण्यासाठी अजुन एक आठवडा विधीमंडळ चालणार असल्याने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीसाठी हेक्टरी किमान ५० हजार रुपये विशेष बाब म्हणून भरपाई मिळण्यासाठी मागणी करावी. मी दि. २४ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांमार्फत निवेदन देवुन झालेल्या नुकसानीसाठी हेक्टरी ५० ते ६० हजार रुपये मदत मिळण्याची मागणी करणार आहे. पालकमंत्री आपल्या जिल्ह्यातीलच असल्याने त्यांची भेट घेऊन केळीला फळबाग पिकात समावेश करण्याची विंतनी करणार असल्याचेही वाघ यांनी सांगितले.