आ. किशोर पाटलांनी मुळ विषयावर बोलावे, अपुर्ण माहितीच्या आधारे भाष्य करु नये – मा. आ. दिलीप वाघ

0

आजी – माजी आमदारात विधानसभा निवडणुकीपूर्वी कलगीतुरा

पाचोरा (प्रतिनिधी) :- गेल्या काही दिवसांपासून आमदार किशोर पाटील व मा. आमदार दिलीप वाघ यांच्यात औद्योगिक वसाहतीच्या विषयावरुन पत्रकार परिषदेचे सत्र सुरू असुन दोघांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन भडगांव येथे औद्योगिक वसाहतीला मंजुरी मिळाली असून औद्योगिक वसाहत मंजुरीबाबत माहिती दिली होती. त्यावर माजी आमदार दिलीप वाघ यांनीही पत्रकार परिषदेचे आयोजन करुन सांगितले होते की, औद्योगिक वसाहत मंजुर झाल्याची ही एक पोकळ माहिती असुन विधानसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेवून आ. किशोर पाटील हे मतदारांची मने जिंकण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. अशी माहिती वाघ यांनी दिली होती.

मा. आ. दिलीप वाघ यांच्या पत्रकार परिषदेला उत्तर देतांना पुन्हा आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, विकासकांना विरोध करण्याची वाघांची परंपरा जुनीच असुन त्यांनी विकासकामांना साथ देण्याचे सोडुन ते राजकीय हेतु साधन्याचा प्रयत्न करित आहेत. त्यावर उत्तर देतांना मा. आ. दिलीप वाघ यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे की, आमदार किशोर पाटील हे मुळ विषयावर न बोलता अपुर्ण माहितीच्या आधारे काहीही भाष्य करु नये असे सांगितले. प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, आ. पाटील यांनी केलेल्या अशक्य कार्यक्रमाच्या घोषणांवर आम्ही केलेल्या टिका ह्या चांगल्याच झोंबलेल्या दिसत आहे. “बहुळाला विरोध”, “शिंगाडा मोर्चा” असेच जावई शोध त्यांनी लावले. कै. ओंकार (आप्पा) वाघ यांनी शिंगाडे मोर्चे जरुर काढले. पण मागणी काय होती ? प्रकल्पग्रस्तांना जमिनी द्या, योग्य मोबदला त्वरीत द्यावा, बांबरुड, सामनेर परिसरातील सरपंच, सोसायट्यांचे चेअरमन, पंचायत समिती सदस्यांचा मेळावा घेवुन बहुधा नदीवर धरण व्हावे. त्यांच्या काळात काम सुरू ही एका मेळाव्याद्वारे सरकारकडे केली होती. नंतर कै. के. एम. (बापु) पाटील हे पाटबंधारे मंत्री झाले. त्यांच्या काळात धरणाचे काम सुरू झाले. आणि सन १९९५ वर्षी कै. ओंकार (आप्पा) वाघ यांनी युती शासनाच्या माध्यमातून धरण पूर्ण केले. हा इतिहास आहे. आ. किशोर पाटील यांनी कपोलकल्पित कहाण्या सांगितल्या म्हणजे इतिहास बदलत नाही.

आम्ही भडगावच्या क्रिडा संकुलाचा मुद्दा मांडतो तर आ. पाटील त्याला फाटा देऊन पी.टी.सी. ने जागा हडप केल्याचा निराधार मुद्दा समोर आणतात. वस्तुस्थिती अशी आहे की, कै. सुपडु भादु पाटील विद्यामंदिर नगरपालिकेच्या जागेवर कै. सुपडु पाटील आमदार असतांना बांधले गेले. त्याकाळात कै. ओंकार (आप्पा) वाघ हे पी.टी.सी. चे सदस्य सुध्दा नव्हते. शहराची गरज म्हणून पी.टी.सी. संस्थेने संस्थेच्या मालकीची जागा नगरपालिकेला पाण्याच्या टाकीसाठी दिली आणि जागांचे हस्तांतरण खुप विलंबाने झाले. या सर्व प्रक्रियेमध्ये कै. के. एम. पाटील, कै. सुपडु पाटील, कै. आर. एस. थेपडे, कै. ओंकार वाघ या सर्वांचा पाठिंबा आणि सहभाग होता. विद्यमान आमदार तेव्हा शालेय विद्यार्थी होते. आणि आज अंगलट आलेल्या विषयांना फाटा देऊन चुकीच्या माहितीवर आधारित धादांत खोटी विधाने करीत आहेत. आता त्यांनी निंभोरा एम.आय.डी.सी. ला दोन वर्षे लागतील असे विधान केले. दहा वर्षातही एम.आय.डी.सी. ही अस्तित्वात येणार नाही असे आमचे ठाम मत आहे. प्रकल्पाला माझा विरोध नाही. पण घोषणा फसवी आहे, गैरलागु आहे. कारण कोणताच अभ्यास न करता उद्योजक, कच्च्या मालाची उपलब्धता, पाणी, वीज यासारख्या अत्यावश्यक बाबींचा पुरवठा या गोष्टी नगरेआड करून चालणार नाही. विधानसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन केलेली ही आमदार किशोर पाटील यांची स्वार्थी घोषणा आहे. अशी माहिती माजी आमदार दिलीप वाघ यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.