आर.आर.विद्यालयाचा नावलौकीक धुळीस मिळविणारे खरे कोण?

0

स्वार्थासाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचे कारण काय

सीबीएससी बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या दोन प्रश्‍नपत्रिका फुटल्यामुळे ती परिक्षा रद्द करून पुन्हा घेण्याचे शासनाने जाहीर केल्यामुळे सध्या शासनावर टिकेचा भडीमार होतोय. वर्षभर अभ्यास करून परीक्षा दिल्यानंतर विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार म्हणून त्यांच्यावर मानसिक आघात झाला आहे. ही घटना ताजी असतांनाच जळगाव शहरातील नावाजलेल्या ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेच्या आर.आर.विद्यालयाच्या संचालकांना उशिरा सुचलेले शहाणपणं म्हणजे त्यांच्या बुध्दीची किव कराविशी वाटते. दहावी बोर्डाची परीक्षा फेबु्रवारी -2018 मध्ये पार पडली. दि.12 फेबु्रवारीला दहावीच्या भूमितीचा पेपर होता. आर.आर.शाळेतील केंद्रावर या भूमितेच्या पेपरला पर्यवेक्षकांनीच विद्यार्थ्यांना कॉपी पुरविली, या पेपरला सामुहिक कॉपीचा सुळसुळाट झाला, बाहेरच्या व्यक्तीने परीक्षा हॉलमध्ये जावून विद्यार्थ्यांना उत्तरे सांगितली. त्या अनोळखी व्यक्तीच्या अंगात निळा शर्ट होता, त्याच बरोबर परीक्षा हॉलच्या बाहेरून खिडक्यांमधून कॉपी पुरविल्या जात होत्या. आणि हे सर्व सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये कैद झालेले आहे. त्या कॅमेर्‍याचा हा घ्या पुरावा. असे सांगून कॉपी पुरविणार्‍या पर्यवेक्षकवर कारवाई करावी, आणि कॉपी करणार्‍या विद्यार्थ्यांना डिबार करावे, याबाबत फौजदारी गुन्हा दाखल करावा, आम्ही याविरोधात कोर्टात याचिका दाखल करणार आहोत. संस्थेच्या 100 वर्षातील नावलौकीक धुळीस मिळाली वगैरे वगैरे माहिती 31 मार्च 2018 रोजी म्हणजे तब्बल दिड महिन्यानंतर पत्रकार परिषद घेवून आर.आर.चे प्रभारी अध्यक्ष दिलीप लाठी यांनी दिली. या पत्रपरिषदेला सचिव मुकूंद लाठी, संचालक विजय लाठी, माजी अध्यक्ष अरविंद लाठी हे उपस्थित होते. ही पत्रपरिषद लाठी यांच्या प्रभात चौकातील निवासस्थानी घेतली होती.
दि.12 फेबु्रवारी 2018 ला दहावीच्या भूमितेचा पेपर जेव्हा झाला तेव्हा लाठी यांना हा सामुहिक कॉपीचा प्रकार कळला असतांना ते दिड महिना गप्प का बसले? लागलीच याबाबतीत आवाज का उठविला नाही? किंवा कॉपी प्रकार चालू असतांना रंगेहाथ पकडून संबंधीत यंत्रणेच्या निर्दशनास आणून देणे आवश्यक होते. परंतु त्यांनी तसे न करता तब्बल दिड महिन्यानंतर आर.आर.शाळेत सामुहिक कॉपीचा प्रकार झाला त्यामुळे विद्यालयाच्या 100 वर्षाच्या नावलौकीकाला गालबोट लागला म्हणून ओरड करणे म्हणजे जाहीर वाच्यता करून आपणच गालबोट लावण्याचा प्रकार केला असे होत नाही का? याबाबतीत लाठी बंधूनी आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी पवित्र अशा शैक्षणिक संस्थेचा मनमानी उपयोग करून त्याचे पावित्र्य नष्ट होते. याचे भान शिक्षण संस्थाचालकांना असायला नको का? विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करणार्‍या शाळेतील शिक्षकांना वेठबिगारासारखे वागविले म्हणून मुख्याध्यापकांसह एकूण 68 शिक्षकांनी संचालकांच्या विरोधात सामुहिक आंदोलन केले. हे कशाचे धोतक आहे. संचालकांच्या मनमानी कारभाराविरोधात शाळेतील 68 शिक्षकांनी केलेले सामुहिक आंदोलन गाजले. शासनाला त्याची दखल घ्यावी लागली. शाळेचे मुख्याध्यापक सरोदे हे सुध्दा संचालकांच्या विरोधात भुमिका घेतात म्हणून त्यांना निलंबित करून काबरा बाईंकडे मुख्याध्यापक पदाची सुत्रे दिली गेली. तथापि, मुख्याध्यापक सरोदे यांना न्यायालयाकडून क्लिनचिट दिली गेली. याचा अर्थ संचालकांनी केलेल्या कारवाईत तथ्य नव्हते असा होत नाही का? तेव्हा संस्थेच्या नावलौकीकाला गालबोट लावण्याचे काम कोणी केले. हे लाठी बंधूनी विचारात घ्यायला हवे.
शाळेत 23 सिसिटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत. त्यापैकी 16 कॅमेर्‍यांवर कापड टाकले अथवा त्यांची दिशा बदलली असा आरोप लाठी यांनी केला आहे. राहिलेल्या पाच कॅमेर्‍यापैकी एका कॅमेर्‍यात हा कॉपी प्रकार कैद झाल्याचा पुरावा त्यांनी पत्रकार परिषदेत दिला. दिड महिन्यानंतर लाठी बंधू यांनी जेव्हा सामुहिक कॉपी संदर्भात आरोप करताय तेव्हा दहावीच्या निम्म्यापेक्षा जास्त उतरपत्रिका तपासल्याही गेल्या असतील अशावेळी सामुहिक कॉपीचे कारण पुढे करून कॉपी करणार्‍या विद्यार्थ्यांना डिबार करा अशी मागणी करणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेशी खेळ करणे असा नव्हे काय? परिक्षा दिलेल्या त्या कोवळ्या विद्यार्थ्यांच्या मनावर काय परिणाम होईल याचा तसुभरहि विचार लाठी बंधूच्या मनाशी शिवला नाही का? परीक्षा यंत्रणा राबविणार्‍या शिक्षण मंडळाची स्वतंत्र यंत्रणा आहे. त्या यंत्रणेच्या कामकाजाविषयी शंका घेण्याचे काम लाठी बंधूनी केले नाही का? जणू कायं आम्हीच सर्वश्रेष्ठ आहोत. अशी शेखी मिळविणारे लाठी बंधू दिड महिने गप्प का बसले हे उशिरा सुचलेले शहाणपणं नव्हे काय? तसेच त्यांच्या या वागण्याने आपल्या संस्थेच्या नावलौकीकाला गालबोट लागते आहे याचे भान त्यांना असू नये काय? त्यामुळे गालबोटाचे खापर दुसर्‍यावर फोडून आपण नामानिराळे राहण्याचा हा त्यांचा प्रकार होय.
शिक्षण संस्था चालक म्हणून आर.आर.शाळेच्या मुख्याध्यापिका विजया काबरा यांना लेखी जाब विचारणे, त्यांचा त्याबाबत त्यांचेकडून खुलासा मागविणे ही प्रशासकीय बाब आम्ही समजू शकतो, पंरतु शाळेतील फुटीर कर्मचार्‍याला हाताशी धरून संस्थेविषयी अशा प्रकारे जाहीर वाच्यता करून संस्थेची बदनामी करणे आणि 100 वर्षाचा नावलौकीक धुळीस मिळविला असे म्हणणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा नव्हे का?
आर.आर.शाळेत दहावीच्या परीक्षा दिलेल्या एका पालकाचा फोन आला. ते म्हणतात हा सर्व प्रकार पाहून माझ्या पाल्याच्या मनात धडकी भरली आहे. तो घाबरला आहे, आता पुन्हा परीक्षा द्यावी लागेल का? असा तो प्रश्‍न विचारतो. अशा परिस्थिती शिक्षणमंडळाने याप्रकरणाबाबत तातडीने खुलासा करावा आणि विद्यार्थ्यांची मानसिकता बिघडणार नाही याची दक्षता घ्यावी. असे पालकांसह सर्वसामान्यांना वाटणे साहजिक आहे. लाठी बंधूनी जाहीर वाच्यता करून त्यांनी एकतर विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर आघात केला त्याचबरोबर आर.आर.सारख्या संस्थेत सामुहिक कॉपी चालते आणि त्याची दखल संबंधीत यंत्रणा घेत नाही. त्याचबरोबर पर्यवेक्षकच कॉपी पुरवितात. असा आरोप करून शिक्षण मंडळा बरोबरच आपल्या 100 वर्षाचा संस्थेचा नावलौकीक धुळीस मिळविण्यास ते कारणीभूत नाहीत का ? असा प्रश्‍न उपस्थित होतो.

धों.ज.गुरव
मो.नं.9527003891

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here