मुंबई : एकमेकांवर वाट्टेल तेवढे आरोप प्रत्यारोप करून शिवसेना आणि भाजपने युतीची घोषणा केली. युती जाहीर झाल्यानंतर घोषित करण्यात आलेल्या जागावाटपात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ) ला एकही जागा न दिल्याने केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दोन्ही पक्षांनी आमच्या पक्षाकरिता एका जागेचा विचार करावा, असेही आठवले म्हणाले. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने संपर्क केला आहे पण मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत राहू इच्छितो असेही त्यांनी स्पष्ट केले.
आगामी लोकसभा निवडणूकीत भाजपा 25 तर शिवसेना 23 जागांवर निवडणूक लढवणार आहे. जर भाजपा आणि शिवसेनेने आरपीआय (अ) ला राज्यात एकही जागा दिली नाही तर माझ्या पक्षाला पुढे नेण्याच्या रणनितीवर विचार करावा लागेल असे आठवले म्हणाले. राज्यात एकूण 48 जागा आहेत. रिपब्लिकन पार्टीसाठी एकही जागा न सोडणे ही एक गंभीर बाब आहे. मी अजिबात समाधानी नाही आहे. त्यांनी दलित समाज, आरपीआय आणि माझा देखील अपमान केला आहे. दलित समाजातून याबद्दल तीव्र प्रतिक्रिया येत आहेत, असेही आठवले म्हणाले.