18 गाड्यांसह 28 अधिकार्यांचा ताफा दाखल; कमालीची गुप्तता
जळगाव –आयकर विभागाने शहरातील दवाखाने लक्ष्य करत विविध दवाखान्यांची तपासणी केली. सदर कारवाईसाठी 18 गाड्यांमध्ये 28 अधिकारी परगावातून आले असून शहरातील विविध दवाखान्यांमध्ये कसून चौकशी दि. 20 रोजी बुधवारी करण्यात येत होती. सदर कारवाईबाबत विभागाकडून कमालीची गप्तता पाळण्यात आली आहे.
शहरातील शाहूनगर रस्त्यावरील गोल्डसिटी, रिंगरोडवरील डाबी, मोठ्या पोस्ट ऑफिससमोरील चिन्मय हॉस्पिटल आदी ठिकाणी आयकर विभागाने छापे मारत कसून तपासणी सुरु केली आहे. आयकर विभागाची कारवाई राज्यात सर्वत्र सुरु आहे. नजीकच्या धुळे शहरातही कारवाई सुरु असल्याचे समजते. जळगावातील कारवाईसाठी राज्यातील नाशिक, औरंगाबाद, पुणे, मुंबई आदी ठिकाणाहून अधिकार्यांना पाचारण करण्यात आल्याचे समजते. शहरातील चिन्मय हॉस्पिटल येथे चौकशी केली असता विभागाकडून आलेल्या एका अधिकार्याने आम्ही अधिकृत माहिती देवू शकत नाही. कारवाईनंतर आपणास संपुर्ण माहिती कळविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
सशस्त्र पोलीस बंदोबस्त
शहरातील कारवाईसाठी राज्यातील आयकर विभागाचे अधिकारी आले असून त्यांना त्यांच्या मागणीवरुन सशस्त्र पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली असून सदर अधिकार्यांसाठी व पोलीस कर्मचार्यांसाठी फुड पॅकेट व पाणी सुद्धा बाहेरुन मागविण्यात आले होते.