जळगाव, दि. 11 (प्रतिनिधी) – देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासन आणि प्रशासनस्तरावरून सर्वतोपरी प्रयत्नांची पराकाष्टा करण्यात येत आहे. आरोग्य विभागासह प्रशासनातील घटक योजित असलेल्या उपाययोजनांना समाजातील सर्वांनी साथ देऊन जळगाव जिल्हा लवकरच कोरोनामुक्त करुया असा निर्धार राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. बैठकीस उपस्थित जिल्ह्यातील नामवंत डॉक्टरांनी आपले विचार मांडले. जिल्हा कोरोनामुक्त करण्यास आम्ही सेवाभावी वृत्तीतून काम करण्यास तयार असून खाजगी दवाखाने अधिग्रहीत करण्यापेक्षा आम्ही शासकीय यंत्रणेसोबत शासकीय रुग्णालयात येवून जिल्ह्यातील 250 डॉक्टर सेवा देण्यास तयार असल्याचे आयएमएचे डॉ.पाटील यांनी सांगितले.
जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आयएमएचे सर्व सदस्य जिल्हा प्रशासनासोबत असून आवश्यक ती सर्व मदत करण्यास तयार असल्याचेही डॉ पाटील यांनी सांगितले. येथील जिल्हा नियोजन भवनात जिल्हास्तरीय जिल्हा आरोग्य सेवा समन्वय समितीची बैठक जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी ते बोलत होते.
या बैठकीला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील, महापौर सौ.भारती सोनवणे, खा.रक्षाताई खडसे, खा.उन्मेश पाटील, आ.संजय सावकारे, सुरेश भोळे, किशोर पाटील, श्रीमती लताताई सोनवणे, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.भास्करराव खैरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण, इंडियन मेडिकल असोशियनचे पदाधिकारी, डॉक्टर्स, समन्वय समितीचे सदस्य उपस्थित होते.
पालकमंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या यंत्रणांना कुठल्याही प्रकारची साधनसामुग्री किंवा निधी कमी पडणार नाही. आरोग्य विभागातील सर्व यंत्रणांनी कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सांघिक प्रयत्न करणे आवश्यक आहे यासाठी सर्व यंत्रणांचा आपआपसात समन्वय महत्वाचा आहे. या काळात खाजगी डॉक्टरांनीही समाजाप्रती आपली सेवाभाव अधिक वृध्दिगंत करत रुग्णांना तपासण्यास किंवा त्याच्यावर इलाज करण्यास नकार देवू नये. योग्य ती खबदारी घेवून आपल्याकडे आलेल्या प्रत्येक रुग्णावर उपचार करावे. कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास त्यांना तातडीने कोविड रुग्णालयात पाठवावे. डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करताना त्यांचे समुपदेशनही करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी खाजगी डॉक्टरांना केले.
नॉनकोविड रुग्णांना होणारा त्रास व जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेतला डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्याल हे कोविड रुग्णालय करावे. व नॉन कोविड रुगणांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार व्हावेत अशी मागणी यावेळी लोकप्रतिनिधींनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली. याबाबत परिस्थितीबघून आवश्यक तो निर्णय घेण्यात येईल असे पालकमंत्र्यांनी बैठकीत सांगितले. त्याचबरोबर बैठकीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी समिती सदस्यांनी परदेशातून येणाऱ्या नागरीकांबाबत धोरण ठरवावे, चोपडा येथील रुगणालयास आवश्यक साधनसामुगी उपलब्ध करुन देणे, नॉन कोविड रुग्णांना गोदावरी हॉस्पिटलला जाणयासाठी वाहन व्यवस्था उपलब्ध करुन देणे, ऑर्डिनन्स फॅक्टरीतील कामगारांना वर्क फ्रॉम होम करण्यासा परवानगी मिळावी, मृत कोरोना बाधित रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्याचे धोरण ठरवावे आदिसह सुचना केल्यात व त्यावर उपाययोजना सुचविल्यात. त्या सुचनांवर लवकरात लवकर निर्णय घेऊन कार्यवाही करण्यास पालकमंत्र्यांनी प्रशासनास सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी जिल्ह्यातील कोरोना विषाणूचे रुग्ण आणि त्यावरील उपाययोजनांची माहिती दिली. जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्र आणि त्यातील निर्बंध, आरोग्य प्रशासन आपले दायित्व योग्यरित्या पार पाडीत असून त्यांनाही शासनाकडून किंवा प्रशासनाकडून योग्य त्या सोयीसुविधा पुरविण्यात येत आहे. निधीची कुठलीही अडचड नसून विलगीकरण कक्ष तसेच प्रत्यक्ष पॉझिटिव्ह रुग्णांच्या इलाजही योग्यरित्या सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. भुसावळ परिसरातील वाढते रुग्ण लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने भुसावळ येथील रेल्वेचे रुग्णालय देखील कोरोना विषाणूच्या रुग्णसेवेसाठी अधिग्रहित केले असून ते रुग्णलय सर्व सोईनिशी सुसज्ज असे आहे. गरज भासल्यास अशाच प्रकारे अन्य ठिकाणीही अशाच प्रकारच्या दवाखान्यांची व्यवस्था करण्यात येईल. अमळनेर हे हॉटस्पॉट असल्याने तेथील नागरिक हे अमळनेरच्या बाहेर कोठेही जाणार नाही याची प्रशासनस्तरावर योग्य ती दक्षता घेण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. कोरोनाबाबत नागरीकांना काही अडचण येत असल्यास त्यांनी जिल्हा सामान्य रुगणालयाच्या हेल्पलाईन क्रमांक 2242111 वर संपर्क साधण्याचे आवाहन केले.