आमदार मंगेश चव्हाण व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची मन्याड धरण, नांद्रे व सायगाव येथे भेटी
गिरणा व मन्याड नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत असल्याने नदीकिनारी असणाऱ्या नागरिकांचे तातडीने स्थलांतरण सुरू

घाबरू नका, सूचनांचे पालन करा, शासन – प्रशासन आपल्या सोबत – आमदार मंगेश चव्हाण यांचे नागरिकांना आवाहन..!
चाळीसगाव लोकशाही न्यूज नेटवर्क
चाळीसगाव तालुक्यातील मन्याड धरणाने धोक्याची पातळी ओलांडली असून खूप मोठ्या प्रमाणात (35188 Cusecs) पाण्याचे विसर्ग धरणातून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आज आमदार मंगेश चव्हाण यांनी जिल्हाधिकारी श्री.आयुष प्रसाद यांच्यासह मन्याड धरणाची व धरणाच्या पायथ्याशी असणाऱ्या नांद्रे गावाची पाहणी केली. पावसाचा जोर असाच राहिल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता देखील नाकारण्यात येत नाही. या पार्श्वभूमीवर सर्व नांद्रे गावाच्या स्थलांतराच्या अनुषंगाने तयार राहण्याच्या सूचना दिल्या. शासन, प्रशासन आपल्या सोबत असून कुठल्याही प्रकारची आपल्याला कमतरता पडणार नाही याची ग्वाही आमदार चव्हाण यांनी ग्रामस्थांना दिली.
यावेळी त्यांनी गिरणा व मन्याड नद्यांचा संगमावर असणाऱ्या सायगाव येथे भेट देऊन पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. दोन्ही नद्यांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रवाह सुरू असून खबरदारीच्या दृष्टीने सर्वांनी सतर्क राहण्याच्या सूचना संबंधितांना केल्या. विशेषतः नदीकाठी राहणाऱ्या ग्रामस्थांनी आपल्या कुटुंब व जनावरांसह स्थलांतरित होण्याची विनंती केली.
आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले की, मी वैयक्तिक शासन – प्रशासनासह परिस्थीतीवर लक्ष ठेवून असून स्थानिक भाजपा पदाधिकारी देखील मदतीसाठी सदैव उपलब्ध आहेत. नागरिकांनी प्रशासनाकडून येणाऱ्या सूचनांचे पालन करावे व आपली काळजी घ्यावी असे आवाहन केले.


