मुरबाड-प्रतिनिधी (सुभाष जाधव) : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रातील अनेक कुटुंबातील 0ते १८ वर्ष वयोगटातील बालकांचे आई व वडिल असे दोन्ही पालकांचे मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक मुले अनाथ झाली आहेत अशा मुलांचे भवितव्य अंधारात जाऊ नये त्यांना शासनाकडून मानसिक व आर्थिक आधार मिळाला पाहिजे यासाठी मुरबाड विधानसभेचे आमदार किसनजी कथोरे यांनी दि. 22 मे 2021 रोजी महाराष्ट्र शासनाकडे पञव्यवहार करुन अशा मुलांची व्यथा पञाद्वारे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे मांडली होती. त्यांच्या या मागणीची महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून दखल घेऊन कोरोना 19 महामारीत दोन्ही पालकत्व हरपलेल्या 0 ते१८ वर्ष वय असणाऱ्या मुलांना राज्य शासनाकडून ५लाख रुपये इतकी रक्कम फिक्स डिपाॕजिट ठेवून मुलांचे संगोपन व शिक्षणासाठी महिना पाच हजार पेंन्शन दिली जाणार असल्याने अशा मुलांना खूप मोठा दिलासा या निर्णयाने मिळणार आहे. ज्या मुलांच्या कुटुंबातील सदस्य किंवा नातेवाईक मुलांचे संगोपन करणार नसतील अशा मुलांना शासन बालगृहात दाखल करुन मुलगी १८ वर्ष व मुलगा २१ वर्षाचा होईपर्यंत त्यांचा सांभाळ शासनाकडून होणार आहे.
या महत्वपूर्ण निर्णयाने महाराष्ट्रातील अनेक मुलांना खूप मोठा दिलासा मिळणार असल्याने आमदार किसन कथोरे यांनी मुख्यमंत्री व महिलाबालविकास मंञी यांचे आभार मानले आहेत.

