आभासी दुनियेपेक्षा वास्तव फारच भयानक!

0

जळगाव :- प्रत्येक व्यक्तीने कुठलीतरी कला जोपासावी. जीवन हे आर्टच्या मार्गाने जाते सायन्सने जात नाही. कला ही आपल्याला आतून बाहेरचा प्रवास घडवते एरवी प्रवास हा बाहेरुन आत असतो. विविधरंगी असणे, नातेसंबंध अवलंबिता ते जगण्याचे गमक आहे. आभास रिसोर्स आहे मात्र त्याचा सोर्स हा वास्तव आहे. सिनेमा, नाटक, सिरीयल यासारख्या आभासी दुनियेत काम करताना वास्तवतेचे भान असणे आवश्यक आहे. मात्र आभासी दुनियेपेक्षा वास्तव फारच भयानक असल्याचे प्रतिपादन घातसुत्र पुस्तकाचे लेखक, अभिनेते, अर्थतज्ज्ञ दिपक करंदीकर यांनी केले.

दिपक करंदीकर यांनी लिहिलेल्या घातसुत्र या पुस्तकाच्या तिसर्‍या आवृत्तीच्या प्रकाशनासाठी ते जळगावी आले होते. यावेळी त्यांनी लोकलाईव्ह स्टुडियोला भेट देत दिलखुलास संवाद साधला प्रसंगी आशा फौंडेशनचे अध्यक्ष गिरीश कुलकर्णी व लोकशाहीचे सहसंपादक राजेश यावलकर उपस्थित होते.

घातसुत्र- 104 वर्षांचा 861 पानी शोधग्रंथ
परदेशात 1912 ते 2016, टायटॅनिक बुडवले गेले तेव्हापासून ट्रॅम्प सत्तेवर आले असा 104 वर्षांचा शोधग्रंथ घातसुत्र आहे. टायटॅनिक घटनेनंतर, डिप्रेशन येणे, दोन्ही महायुद्ध, तेलाचे राजकारण, डॉट कॉम घोटाळा, 9/11 चे दहशतवादी कृत्य, इराण- इराक वार आदींवर शोधनिबंध आहेत. या घटना घडलेल्या नसून घडविल्या गेल्या आहेत.या पुस्तकासाठी 7 वर्षे परिश्रम घेतले असून 481 पुस्तकांचा अभ्यास केलेला आहे. पुस्तकाचे तीन भाग असून पहिल्या भागात 1912 ते 2016 चा घटनाक्रम. दुसर्‍या भागात घटना घडविणारे सुत्रधार तर तिसर्‍या भागात घटना घडविण्यासाठी केलेल्या सोयीसुविधाचा समावेश यात आहे. साधारणत: शिवाजी महाराजांच्या कालखंडानंतर युरोपात ब्रिटीश, फ्रेन्च, स्पेन पोर्तुगिज या चार सत्ता होत्या. या चार सत्तांनी जगाला लुटले. या चार सत्ता संपल्यानंतर अमेरिकेचा उदय झाला. अमेरिकेच्या खांद्यावर हात ठेवून काहींनी जगभरात दहशतवादी घातपाताच्या कारवाया केल्याची माहिती करंदीकरांनी दिली.

प्रगल्भता वाढावी हा प्रकाशनामागचा उद्देश- गिरीश कुलकर्णी
घातसुत्र या पुस्तकाची परिक्षणं वाचली. एका माणसाने जगावेगळं काहीतरी केलं आहे. एक राष्ट्र जगाला कसे वेठीस धरते ते पुराव्यासह मांडलेलं आहे. ते समाजापर्यंत गेले पाहिजे, त्यावर मंथन व्हावे, युवकांनी प्रेरणा घ्यावी त्यांची प्रगल्भता वाढावी, असा प्रकाशनामागचा उद्देश असल्याचे आयोजक गिरीश कुलकर्णी यांनी सांगितले.

शांत संवादाचं व्यासपीठ – लोकलाईव्ह
लोकलाईव्हसारखी शांत संवादाची व्यासपीठ असली पाहिजे, असा गौरव दिपक करंदीकरांनी लोकलाईव्ह स्टुडियोचा केला. यावेळी रसिकांना संदेश देताना ते म्हणाले. आपल्या पुर्वजांनी, आईवडीलांनी जो देश आपल्याला दिला होता तो चांगला होता. आपल्या हातात काही नसले तरी भावी पिढीला चांगल्या वाईटाची समज देवून सजग करणे तरी आपल्या हातात असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.