आप्पासाहेब पवार कृषी उच्च तंत्र पुरस्काराचे अविनाश पाटोळे मानकरी

0

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते ३० रोजी वितरण

जळगाव ;– जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.तर्फे अखिल भारतीय पातळीवर कृषि क्षेत्रातील अग्रगण्य व अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार असलेल्या पद्मश्री डॉ. आप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्च-तंत्र पुरस्कार’ वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरदराव पवार हे राहतील. जैन हिल्स येथील आकाश सभागृहात सकाळी ११. ४५ ला हा सोहळा संपन्न होणार आहे. या पुरस्काराचे मानकरी वडनेर भैरव (जि. नाशिक, ता. चांदवड) येथील प्रगतीशील शेतकरी अविनाश मनोहर पाटोळे हे आहेत. त्यांना २०१६चा हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

आप्पासाहेब पवार कृषी उच्च-तंत्र पुरस्कार दर दोन वर्षांनी दिला जातो. या पुरस्काराचे यंदा १४ वे वर्ष आहे. सन्मानचिन्ह, दोन लाख रुपये व पुरस्कारार्थींचा सपत्नीक सत्कार असे पुरस्काराचे स्वरुप आहे. महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट अशा पाच महसुल विभागातून शेतकऱ्याची निवड या पुरस्कारासाठी केली जाते. यावर्षी उत्तर महाराष्ट्रातून ही निवड करण्यात आलेली आहे. पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष दापोली कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एस. मगर व निवड समितीच्या सदस्यांनी ५० शेतकऱ्यांमधुन श्री. पाटोळे यांची निवड केलेली आहे. पाटोळे यांनी उच्च कृषी तंत्रज्ञान, सुक्ष्मसिंचन पद्धती, शेतीमध्ये नवनवीन प्रयोग त्याच प्रमाणे विविध पिकांचे अधिक उत्पादन घेऊन शाश्वत शेती केली आहे. कृषी क्षेत्रातील त्यांच्या या कामगिरीला अधोरेखीत करून पुरस्कारासाठी ही निवड झालेली आहे.

या पुरस्कार सोहळ्यास शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन सेवादास दलूभाऊ जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, कविवर्य ना. धों. महानोर यांनी केले आहे.

या पुरस्कार वितरण सोहळ्यास पालकमंत्री तथा महसुलमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती उज्वला पाटील, विधानसभा सदस्य माजी मंत्री एकनाथराव खडसे, माजी मंत्री सुरेशदादा जैन, खासदार ए. टी. पाटील, खासदार रक्षा खडसे, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, आमदार सुधीर तांबे, आ. स्मिता वाघ, आ. चंदुलाल पटेल, आ. डॉ. सतीश पाटील, आ. संजय सावकारे, आ. हरिभाऊ जावळे, आ. सुरेश भोळे, आ. चंद्रकांत सोनवणे, आ. शिरीष चौधरी, आ. उन्मेश पाटील, आ. किशोर पाटील, महापौर ललित कोल्हे उपस्थित राहणार आहेत.

आजपर्यंतचे पुरस्कार विजेते:

सोलापूर जिल्ह्यातील तेलंगवाडी या गावाचे माननीय कृषीभूषण विश्‍वासराव दत्तात्रय कचरे आणि सौ. शीलाताई कचरे हे या पुरस्काराचे प्रथम विजेते. डाळिंब पिकात असामान्य कर्तृत्व सिद्ध केल्याने हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. आकोट, जिल्हा अकोला येथील उद्यानपंडित प्रभाकर तुळशीराम मानकर आणि सौ. कांताबाई मानकर हे या पुरस्काराचे दुसरे विजेते मानकरी. संत्रा पिकात त्यांनी बिनीचे कार्य केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. लोहारा, जिल्हा जळगाव येथील कृषीभूषण विश्‍वासराव आनंदराव पाटील आणि सौ. निर्मला पाटील यांना सेंद्रीय शेतीकरिता तिसरा पुरस्कार देण्यात आला. कडवंची, जिल्हा जालना येथील उद्यानपंडित भगवानराव यशवंतराव क्षीरसागर आणि सौ. तुळसाबाई क्षीरसागर यांना फळबागायत, मृद संधारण व जलसंधारणाच्या कामांबद्दल हा चौथा पुरस्कार देण्यात आला. आंतरराष्ट्रीय महिला वर्षाच्या सम-समासंयोगाने महिला शेतकर्‍याचा पाचवा पुरस्कार मौजे वाघापूर जिल्हा पुणे येथील कर्तृत्ववान शेतकरी सौ. मनीषा भाऊसाहेब कुंजीर यांना फुलशेतीबद्दल देण्यात आला. कोकणातील नरवण जिल्हा रत्नागिरी येथील प्रगतीशील आंबा बागायतदार डॉ. अनिल विठ्ठल जोशी, अकोला जिल्ह्यातील चितलवाडी येथील प्रगतशील शेतकरी विजय आत्माराम पाटील (इंगळे) यांना प्रदान करण्यात आलेला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.