खामगाव- लॉकडाऊनमुळे उपासमारी ओढवलेल्या गरीब-गरजु नागरीकांसाठी येथील सतीफैल भागातील हनुमान व्यायाम मंडळ संकटमोचकाच्या रूपात पुढे आले आहे. त्याभागातील मजुरी आणि रोजंदारी करणार्या सुमारे 250 नागरीकांना दररोज सायंकाळी भोजनाचे वाटप केल्या जात आहे.
क्रिडा व सांस्कृतीक क्षेत्रात नावलौकिक असलेले येथील सतीफैल स्थित श्री हनुमान व्यायाम मंडळ कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर सामाजिक बांधिलकी जोपासत लॉकडाऊनच्या काळात हालअपेष्टा सोसणार्या गरजु नागरीकांच्या मदतीला संकटमोचक बनून धावून आले आहे. संपूर्ण देशासमोर कोरोना संसर्गाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे देशात या महामारीला आळा घालण्यासाठी शासनाने 3 मे पर्यंत लॉकडाऊन घोषित केला आहे. या परिस्थीतीत अनेक मजुरवर्ग, रोजंदारी करणार्यांच्या हाताला कुठलेच काम नाही. अशावेळी त्यांना आर्थिक संकटासोबत उपासमारीलाही सामोरे जावे लागत आहे. आज रोजी ‘अन्नदानपेक्षा श्रेष्ठ दान’ कोणतेच नाही, या उक्तीला साजेशी भूमिका घेत शहरातील अनेक दानशुर व्यक्ती या गरजुंच्या मदतीला धावून येतांना दिसून येत आहे. त्यातच येथील हनुमान व्यायाम मंडळानेही त्या भागातील सुमारे 250 गरजवंतांना एकवेळचे भोजन देवून त्यांना या उपासमारीच्या विळख्यातून बाहेर काढण्याचे विधायक कार्य सुरू केले आहे. हनुमान व्यायाम मंडळाकडून 17 एप्रीलपासून दररोज रात्री 7 ते 8 या वेळेत त्याभागातील मजुरी आणि रोजंदारी करणार्यांसह अनेक गरजवंत नागरीकांनाही मंडळाकडून भोजन प्रसादीचे वाटप केले जात आहे. भोजन प्रसादीमध्ये 25 ते 30 किलोच्या पोळ्या आणि 20 ते 25 किलोची भाजी वितरीत केली जाते. भोजन वाटप करतांना मंडळाकडून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत कोणतेही फोटो सेशन न करता अन्नदान केले जात आहे.