आनंदाची बातमी : होरपळणाऱ्या महाराष्ट्रात पडणार दमदार पाऊस

0

पुणे – भारतीय हवामान विभागाने दिलासादायक बातमी दिली आहे. दुष्काळाने होरपळणाऱ्या महाराष्ट्रात यंदा नैर्ऋत्य मोसमी पाऊस (मॉन्सून) दमदार पाऊस पडेल, असा सुधारित अंदाज वर्तविण्यात आला. देशात जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये यंदा पाऊस सरासरी इतका राहणार आहे. त्यामुळे या वर्षीसारखे पाण्याचे भीषण दुर्भिक्ष होण्याची शक्‍यता कमी आहे. देशात यंदा सर्वसाधारण म्हणजे शंभर टक्के पाऊस पडेल, असे हवामान खात्याने प्रसिद्ध केलेल्या सुधारित अंदाजात नमूद केल्याने तहानलेल्या महाराष्ट्राला यातून निश्‍चित दिलासा मिळेल.

मान्सूनचे अंदमान निकोबार बेटांवर आगमन झालं असून पण पुढची वाटचाल संथ गतीने होत आहे. साधारण 6 जूनला मान्सून केरळात येईल, असा ताजा अंदाज आहे. तसेच देशातील मध्य भारतात जून ते सप्टेंबरदरम्यान शंभर टक्के पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या मध्य भारतात महाराष्ट्राचाही समावेश होतो. त्यामुळे यंदा महाराष्ट्रातही दमदार पाऊस पडेल, असे हवामान खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले.

वायव्य भारतात 94 टक्के, दक्षिण भारतात 97 टक्के आणि ईशान्य भारतात तेथील पावसाळ्यात पडणाऱ्या सरासरी पावसाच्या 91 टक्के पाऊस पडेल, असे या सुधारित अंदाजात म्हटले आहे. मॉन्सूनवर परिणाम करणाऱ्या वेगवेगळ्या सहा घटकांचा समावेश असलेल्या सांख्यिकी प्रारूपावर आधारित यंदा सरासरीच्या 96 टक्के पाऊस पडेल (त्यात 4 टक्के कमी-जास्त) असा अंदाज वर्तविला आहे; तर “भारतीय उष्णकटिबंधीय हवामान संस्थे’ने (आयआयटीएम) विकसित केलेल्या “मॉन्सून मिशन’ प्रारूपानुसार 97 टक्के (चार टक्के कमी-जास्त) पाऊस पडेल, असेही खात्याने स्पष्ट केले.

असा होईल मॉन्सून

पावसाचे प्रमाण …….. शक्‍यता

90 टक्‍क्‍यांहून कमी ……..15 टक्के

90 ते 96 टक्के …….. 32 टक्के

96 ते 104 टक्के …….. 41 टक्के

104 ते 110 टक्के …….. 10 टक्के

110 टक्‍क्‍यांहून अधिक …….. 2 टक्के

Leave A Reply

Your email address will not be published.