आत्मचिंतनाची वेळ बालेकिल्ले गमवणाऱ्यांवर आलीय; संजय राऊतांची भाजपवर टीका

0

मुंबई । शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर काही दिवसांपूर्वी अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया पूर्ण झाली होती. आज त्यांना लीलावती रुग्णालयात डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर संजय राऊत  यांनी रुग्णालयातून सुट्टी मिळताच भाजपचा समाचार घेतला. भाजपने पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील आपल्या पराभवनानंतर शिवसेनेवर टीका केली होती. पराभवाबद्दल शिवसेना आत्मचिंतन करेल. हा काही दोष नाही तो गुण आहे. आत्मचिंतनाची वेळ ही बालेकिल्ले गमवणाऱ्यांवर आली आहे. चिंतन आणि आत्मचिंतनाची बैठक त्यांच्याकडे जास्त आहे. आम्ही कृती आणि अ‍ॅक्शनवाले, असेही संजय राऊतांनी यावेळी म्हटले.

येत्या निवडणुकांसाठी भाजपकडे मास्टर स्ट्रॅटजी आहे. त्यांच्याकडे मोठी फौज आहे. आम्ही साधे लोक आहोत. बसून चर्चा करतो, बैठका घेतो. कार्यकर्ते काम करतात. मात्र त्यांच्याकडे जागतिक यंत्रणा आहे. जागतिक स्तरावरुन त्यांना मदत मिळते, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावला. तसेच आगामी मुंबई महापालिका किंवा इतर निवडणुकीत महाविकासआघाडी एकत्र लढेल, असे संकेतही राऊतांनी दिले.

हाविकासआघाडीचं शिल्प घडवून एक वर्ष झालं. ते काही तुटत नाही. पुढील चार वर्ष चालेल. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निकालानंतर समाजाचा कल कुठे आहे, ते आपल्याला समजायला लागलं आहे. पदवीधर आणि मतदारसंघात विचार करुन मतदान केले जाते. लोकांचा पाठिंबा कसा आहे, हे काल दिसलं. गेली 40 ते 45 वर्ष भाजपचा उमेदवार असलेल्या नागपुरातही काँग्रेसचा उमेदवार मोठ्या फरकाने जिंकला, असे संजय राऊत म्हणाले. अमरावती शिक्षक मतदारसंघात बहुरंगी लढत झाली. गेल्यावेळी श्रीकांत देशमुख हे अपक्ष लढले. आता त्यांना शिवसेनेने पाठिंबा दिला होता. आम्ही सर्व मिळून निवडणूक लढलो. आम्ही प्रत्येक निवडणूक ही महाविकासाआघाडी म्हणून बघतो, असेही राऊतांनी सांगितले.

“बालेकिल्ले हे गाफिलपणातही हरत नाही”

भाजपला जो धक्का बसला, तो साधा नाही. नागपूरला भाजपचा पराभव होणे म्हणजे शिवसेनेने परळ, लालबाग गमावण्यासारखे आहे. हे आमचे बालेकिल्ले आहेत. बालेकिल्ले हे गाफीलपणातही हरत नाही. पराभव झाला यानंतर नक्कीच चिंतन करु. त्या मतदारसंघात आम्हाला फार कमी वेळा यश मिळालं आहे, असेही राऊतांनी स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.