महापौरांनी घेतली मक्तेदारी बैठक ; बैठकीत केल्या तात्काळ कामे सुरु करण्याच्या सूचना
जळगाव (प्रतिनिधी) ;- शहरात ठिकठिकाणी खड्डे पडले असून गेल्या अनेक महिन्यांपासून नागरिकांना याचा त्रास सोसावा लागत आहे. मात्र आता सोमवारपासून खड्डे बुजविण्याला प्रारंभ होणार असल्याची माहिती महापौर भारतीताई सोनवणे यांनी आज मनपात मनपाच्या मक्तेदारांच्या आयोजित बैठकीत दिली .
यावेळी बैठकीला नगरसेवक कैलास सोनवणे, भारत कोळी, धीरज सोनवणे, मनपा शहर अभियंता अरविंद भोसले आणि मक्तेदार उपस्थित होते.
यावेळी महापौर भारतीताई सोनवणे म्हणाल्या कि शहरात असणाऱ्या खड्ड्यांमुळे नागरिकांना त्रास होत आहे. मनपा प्रशासनाकडून प्रत्येक प्रभागासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असून लवकरात लवकर कामाला सुरुवात करून सुरुवातीला मुख्य, मोठे आणि त्या प्रभागातील रहदारीच्या रस्त्यावरील खड्डे बुजवावे, अशा सूचना महापौरांनी दिल्या. खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्ते तयार करण्याच्या कामाला देखील सुरुवात होईल असेही त्यांनी सांगितले.
मक्तेदारांकडून कामे करून घ्यावीत
शहरातील खड्डे बुजविण्याच्या कामाला प्रत्येक प्रभागात सुरुवात होणार आहे. आपापल्या प्रभागात होत असलेले काम योग्य पध्दतीने होते की नाही हे त्या परिसरातील नगरसेवक, लोकप्रतिनिधी व नागरिकांनी स्वतः उभे राहून तपासावे. संबंधित मक्तेदाराकडून योग्य काम करून घ्यावे असे आवाहन महापौर सौ.भारती सोनवणे यांनी केले आहे.