पाचोरा | प्रतिनिधी
सद्यस्थितीत सर्वत्र चांगल्या स्वरुपाचा पाऊस पडत आहे. यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. परंतु शेती करत असतांना शेतकऱ्यांना त्यांचा शेतीमध्ये वाढलेल्या बांध बंधाऱ्यांवरील काटेरी झुडपे व गवत हे डोकेदुखी ठरत आहे. या कामासाठी सहसा मजुरही मिळत नाही. व निंदणी कामासाठी लावलेले मजुर हे शेतातील बांध बंधाऱ्यांवरील वाढलेले काटेरी झुडपे व गवत काढण्यास असमर्थता दाखवतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे व गवत वाढुन शेती मशागतीच्या कामासाठी मोठा अडथळा निर्माण होत आहे. मात्र आता शेतकऱ्यांसाठी सोयीस्कर असे काटरे झुडपे व गवत काढणी यंत्र पाचोरा येथील युवा संशोधक योगेश बारी यांनी बनविले आहे.
पाचोरा शहरातील रहिवाशी योगेश बारी या युवा संशोधकाने काटेरी झुडपे व गवत कापणी यंत्र बनविले आहे. हे कापणी यंत्र शेतकऱ्यांसाठी वरदानच ठरणार आहे. या कापणी यंत्राची वैशिष्ट्ये म्हणजे कोणीही व्यक्ती सहजरीत्या हाताळु शकतो. याला शाॅक लागण्याची देखील भिती नाही. हे यंत्र बॅटरीच्या साहाय्याने तसेच फवारणी स्पे पंपाच्या साहाय्याने देखील उपयोगात आणले जावु शकते. हे यंत्र वजनाने हलके व सहजरीत्या हाताळता येणारे यंत्र आहे. हे कापणी यंत्र बनविण्यासाठी एक इंची पी. व्ही. सी. पाईप, स्टीलचे ब्लेड, हाय पावर १२ व्होल्टची मोटर, आॅन आॅफ स्विच, १२ व्होल्ट व १२ एम्पीयरची बॅटरी, थ्री पिनची वायर (फवारणी स्प्रे पंपास लागणारी) असे साहित्य उपयोगात घेतले आहे. या यंत्रास बनविण्यासाठी सुमारे १ हजार ८०० रुपये इतका खर्च लागला असल्याचे योगेश बारी यांनी सांगितले.
योगेश बारी हे युवा संशोधक पुरस्कार प्राप्त जिल्ह्यातील पहिले
शहरातील छबुलाल ठाकरे नगर मधील रहिवाशी योगेश बारी यांना बालपणापासूनच विविध उपकरणे बनविण्याचा छंद असल्याने ते नियमित वेगवेगळ्या उपकरणांची निर्मिती करत असतात. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरी बद्दल त्यांना राज्याचे दिवंगत गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे हस्ते जिल्ह्यातील पहिले “युवा संशोधक” म्हणुन गौरविण्यात आले होते.