मुंबई :-राज्यातील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचार्यांना अर्धा तासच जेवणाची सुट्टी देण्यात आली आहे. म्हणजे एक ते दोन या वेळेत कधीही अर्धा तासाची सुट्टी कर्मचारी जेवणांसाठी घेऊ शकतात. खात्यातील सर्वच जणांनी एकाच वेळी जेवायला जाऊ नये, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला कोणत्याही वेळी ‘साहेब जेवायला गेले आहेत’ ही सबब कानावर पडणार नाही.
नवीन आदेशानुसार राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी कार्यालयीन वेळेत दुपारच्या भोजनासाठी दुपारी एक ते दोन या दरम्यान अर्ध्या तासाची वेळ निश्चित करण्यात आली आहे. दुपारच्या जेवणासाठी अधिकारी व कर्मचारी ३० मिनिटांपेक्षा अधिक वेळ घेणार नाही. एकाच विभाग अथवा शाखेतील सर्व अधिकारी व कर्मचारी एकाच वेळेस जेवणासाठी जाणार नाहीत, याची संबंधित कार्यालयाच्या विभागप्रमुखांनी दक्षता घ्यावी असे आदेशही सामान्य प्रशासन विभागाने जारी केला आहे. त्यामुळे सर्व सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना ३० मिनिटात जेवण संपवून टेबलवर बसून काम सुरू करावे लागणार आहे.