जळगाव – तब्बल चार वेळा मुदतवाढ मिळालेल्या लेंडी नाल्याचे काम दि.२५ रोजी सायंकाळपर्यंत पूर्ण झाले असून आजपासून हा रस्ता सकाळी १० वाजता वाहतुकीसाठी खुला होणार आहे. वाहतुकीस कोणताही पर्याय न देता शिवाजीनगरच्या रेल्वे उड्डाणपूलचे काम सुरु असल्याने या पुलावरील वाहतूक गेल्या दोन महिन्यापासून बंद आहे. पर्यायी रस्त्यासाठी शिवाजीनगर वासियांनी रेल्वे रोको आंदोलन केल्यानंतर हा रस्ता खुला करण्यात आला.
शिवाजीनगरचा उड्डाणपूल तयार करण्यात आला होता. या पुलाची कालमर्यादा संपुष्टात आलेली असल्याने नवीन पूल तयार करण्याचे काम रेल्वे प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरु आहे. पर्यायी रस्ता नसल्यामुळे नागरिकांना सुरत व असोदा रेल्वे गेटमार्गे ८ ते १० किलीमीटरच्या फेऱ्याने शहरात यावे लागत आहे. शनिपेठमार्गे जवळचा पर्यायी रस्ता आहे. परंतु या नाल्यावरील रेल्वेपुलाचे काम महापालिकेतर्फे सुरु असल्यामुळे नागरिकांना फेऱ्याने ये-जा करावी लागत आहे. आता रेल्वेपुलाखालील काम पूर्ण झाले असून या पुलाखालून मिनी बस, स्कूल बस, रुग्णवाहिका, दुचाकी, तीनचाकी असे वाहनांसाठी हा पूल शुक्रवारी सकाळी १० वाजेपासून खुला होणार आहे. मात्र ट्रक, एस टी, डंपर या अवजड वाहनांची उंची जास्त असल्यामुळे या वाहनांना या ठिकाणाहून जाता येणे शक्य नसल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.