नवी दिल्ली – नवी दिल्ली – सार्वजनिक इंधन कंपन्यांनी स्वयंपाकासाठी घरगुती वापर होणाऱ्या गॅस सिलिंडरच्या दरात 10 रूपयांची कपात केली. नवे दर 1 एप्रिलपासून लागू होणार आहेत. सिलिंडर अल्पसा का होईना स्वस्त झाल्याने महागाईने होरपळलेल्या जनतेला काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
सध्या १४.३ किलोग्रॅमच्या विनाअनुदानित सिलिंडरसाठी मुंबईत ८१९ रुपये मोजावे लागतात. दिल्लीतही सिलिंडरचा दर इतकाच आहे. तर कोलकात्यात सिलिंडरसाठी ८४५.५० रुपये, चेन्नईत ८३५ रुपये मोजावे लागतात. इंडियन ऑईल कॉर्पोरेशननं सिलिंडरच्या दरात कपात केल्यानं उद्यापासून मुंबई, दिल्लीत सिलिंडर ८०९ रुपयांना मिळेल. तर कोलकात्यात ८३५.५० रुपयांना आणि चेन्नईत ८२५ रुपयांना मिळेल.
गेल्या २ महिन्यांत सिलिंडर १२५ रुपयांनी महागला
गेल्या काही दिवसांपासून घरगुती वापराच्या सिलिंडरच्या दरांत सातत्यानं वाढ सुरू होती. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये स्वयंपाकाच्या सिलिंडरची किंमत १२५ रुपयांनी वाढली. ४ फेब्रुवारीला सिलिंडरची किंमत २५ रुपयांनी वाढली. त्यानंतर १५ फेब्रुवारीला सिलिंडरचा दर ५० रुपयांनी वाढला. २५ फेब्रुवारीला २५ रुपयांची, त्यानंतर १ मार्चला २५ रुपयांची वाढ झाली.
साधारणपणे सिलिंडरचा दर बदलाच्या दिवशीच जाहीर केला जातो. मात्र, यावेळी तो एक दिवस आधीच जाहीर करण्यात आला. पश्चिम बंगाल आणि आसाम विधानसभा निवडणुकांसाठी उद्या (गुरूवार) दुसऱ्या टप्प्याचे मतदान होणार आहे. त्या मतदानाच्या आदल्या दिवशी सिलिंडर स्वस्त होण्याची घडामोड घडली आहे.

