ज्येष्ट पत्रकार भाऊ तोरसेकर यांचे प्रतिपादन
जळगाव | प्रतिनिधी
आजच्या पत्रकारितेने समाज हादरत नाही. पत्रकारांना कोणी घाबरत नाही. पत्रकारांची परिणामकारक आदरयुक्त भिती वाटली पाहिजे तशी ती राहिलेली नाही. पत्रकारितेला व्यापारी स्वरुप प्राप्त झाले आहे. आज दैनिकांना स्किम लावावी लागते. दर्जेदार माल हवा अंक वाचनीय असावा, मात्र आजची पत्रकारिता ही बोचरी नाही तर चोमडी जरूर झाली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ट पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी केले. ते जळगावी आले असता त्यांनी लोकलाईव्ह स्टुडियोस भेट दिली. यावेळी दिलखुलास मुलाखतीत ते बोलत होते. प्रसंगी लोकशाहीचे सहसंपादक राजेश यावलकरांची उपस्थिती होती.
पत्रकारितेत आशय असावा विषय नसावा
आपली सुरुवातच आचार्य अत्रेंच्या मराठा वृत्तपत्रातून झाली. अत्रेंच्या आक्रमक लिखाण त्यावेळी अनुभवले असल्याचे ते म्हणाले. त्यांचे आजवर 10 हजार लेख, जागता पहारा अंतर्गत4 हजार लेखांक, परखड लिखाण विविध वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाले आहे. आपल्या 50 वर्षांच्या कारकिर्दीत आपल्याला भिती वाटलेली नाही. आजवर आपल्याला एकही लिगल नोटीस दिली गेलेली नाही. कारण मी सर्वाबाबत टोकाचं लिहितो कारण मी त्यांचे दोष त्यांना दाखवितो, असे तोरसेकर म्हणाले. पत्रकार डॉक्टरच्या भूमिकेत असावा. एखादा माणूस आपल्याला इजा करावयास आल्यास आपण त्याला विरोध करतो. मात्र डॉक्टरही आपल्याला शस्त्रक्रियेच्या माध्यमातून इजा करतो त्याला आपण सहमत असतो असे सांगत त्यांनी पत्रकारितेत आशय असावा मात्र विषय नसावा असे सांगितले.
सुपारी घेणार्या पत्रकारांवरच हल्ले!
पत्रकाराने पक्षपाती असू नये पत्रकारिता हा पेशा आहे. समाजात डॉक्टर, कंडक्टर, वाणी यांच्यावरही हल्ले होतात. दोष देताना पक्षपाती असू नये. चूक दाखवावी, चूक दाखविताना दुसर्याची बाजू घेतली तर हल्ले होणारच! असे त्यांनी ठासून सांगितले. समाज सुधारण्यासाठी आपण प्रयत्न करतो त्यांना समजेल अशा भाषेत लिहिले पाहिजे. लिखाणातून बदल घडला पाहिजे. त्या बदलाला पत्रकारिता म्हणतात. अडाण्यांच्या लोकशाहीत अशी किंमत मोजावीच लागेल? असे कान त्यांनी यावेळी टोचले. सापही डिवचल्याशिवाय चावत नाही. पत्रकारांच्या गुन्ह्याला मागे घालतात त्याला मी माफिया म्हणतो. पत्रकारितेत माफिया असेल तर गँगवार होणारच! पत्रकारिता ही संघर्षातून आली आहे. पुढची पिढी पत्रकारिता धारदार करेल याबाबत बोलताना पिंडीवर विंचू बसला तर विंचवाला मारण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
धामधूम आहे तुल्यबळ लढत नाही
2014 सारखाच 2019 चा सामना आहे. मोदी अजूनही त्याच मुडमध्ये आहेत. तुल्यबळ लढत नसल्याने सामना एकतर्फी आहे. मोदी लाटेबाबत बोलताना तुम्हाला लाट कळते का? 2014 मध्ये लाटेबाबत कोणी म्हटले नाही निकाल लागल्यावर मोदी लाट म्हणायला लागले. तुम्हाला समजली नाही अंडर करंट असेल तर तुम्हाला शॉक बसायला हवा. लाटेबाबत सांगता येत नसेल तर तुम्ही विश्लेषक कसे? असा सवाल त्यांनी विचारला. 2013 च्या लेखात पंतप्रधानपदी मोदींचं भाकीत आपण केलं असल्याचे ते म्हणाले. 2013 मध्ये मोदीच का? असे पुस्तक आपले आले आहे. त्याचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मी मोदींना बहुमत मिळेल असे भाकीत केले असता माझी टिंगल करण्यात आली होती.
महागठबंधनमुळे जागांची वजाबाकी
ज्यावेळी महागठबंधन होते त्यावेळी जागांची वजाबाकी होते हा इतिहास आहे. डिसेंबरमध्ये 5 राज्यात निवडणुका झाल्या. तीन राज्यात भाजपा हरली. राजस्थान व मध्यप्रदेशात एक टक्क्याने कमीजास्त झाले. छत्तीसगड मध्ये घसरले. तेलंगणात महागठबंधन असल्याने चंद्रशेखर रावतेंना 25 जागा मिळाल्या. मतदानाच्या बाबतीत दोन तीन पक्षांची बेरीज ही वजाबाकी असते. महागठबंधनमुळे मोदी 350 च्या पुढे जातील, असे भाकीत त्यांनी यावेळी केले.
विधानसभेलाही राज ठाकरे प्रचार करतील का?
सध्या राज ठाकरे यांच्या सभेला गर्दी होते या मुद्यावर बोलताना पूर्वी एस.एम. डांगे व आचार्य अत्रेंच्या सभेलाही गर्दी व्हायची. मात्र त्याचा परिणाम मतपेटीवर नव्हता. तेव्हा अत्रे म्हणाले होते की, इथे गर्दी करतात मात्र मतदानाच्या दिवशी नागपंचमी करतात. ते सत्ता हातात द्या असे कधीच म्हणाले नाहीत. पर्याय देतो सत्ता द्या, असे बाळासाहेब म्हणाले. राज म्हणतात मोदींना पाडा. याबाबत मानसिकता स्थैर्य लागते. राज ठाकरे गर्दी जमवायला ठीक आहेत. सिमकार्ड फुकट मात्र चार्जिंग फुकट नसते. राज ठाकरे प्रामाणिकपणे काम करतात. यामुळे मात्र विधानसभेत काँग्रेस व राष्ट्रवादीचे नुकसान होणार आहे. आज त्यांच्या बाजूने बोलतात विधानसभेत यांचाच ते प्रचार करतील का? त्यांचा चांगला डाव आहे. पुढे काँग्रेस व राष्ट्रवादीला भारी पडणार आहे.
प्रज्ञासिंग बाबत विचारणारे लोक असंस्कृत असभ्य असल्याचा आरोप त्यांनी केला. कारण प्रज्ञासिंग या एकट्याच जामिनावर मुक्ततेनंतर निवडणुक लढवत नसून लालूप्रसाद यादव, राहुल गांधी, सोनिया गांधी, चिदंबरमचे पुत्र हेही जामिनावर आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
आवडणारे काम निवडा
प्रामाणिकपणे काम करा आईनस्टाईनने म्हटले आहे की, आपल्याला आवडणारे काम निवडा तुम्हाला आयुष्यभर काम मिळेल. मी 24 तास पत्रकरिता करतो. दिवसाला पाच लेख लिहितो. आवडणारे काम कराल तर सुखी व्हाल, असा संदेश त्यांनी यावेळी दिला.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.